”फादर्स डे” च्या दिवशीच मुलाकडून आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी

बीड जिल्ह्यात घाटशिळ पारगाव येथे मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  बीड : एकीकडे फादर्स डे निमित्ताने संपूर्ण देशभरात वडिलांचे ऋण व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यात घाटशिळ पारगाव येथे मुलगा आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड जिल्ह्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करत असताना चा व्हिडिओ गावातीलच एका व्यक्तीने शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भाने अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मारहाण करत आहे. असे कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर हिचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

  फादर्स डे दिवशीच वडिलांना मारहाण…

  आज जागतिक फादर्स डे आहे. यानिमित्ताने देशभरात वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे बीड जिल्ह्यात घाटशिळ पारगाव येथे आई-वडिलांना काठीने मारहाण करताना मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही बाब खेदजनक आहे.

  तात्काळ चौकशी करू…

  याबाबत बीड चे पोलिस अधीक्षक आर. राजा यांना विचारले असता ते म्हणाले की, वायरल झालेल्या त्या व्हिडिओ ची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार खेदजनकच आहे.