आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक; बीडमधे तीव्र आंदोलनाच्या तयारीत

राज्य शासनाच्या विनंतीनुसार मूक आंदोलन एक महिना स्थगित करण्यात आले, ही मुदत १७ जुलै रोजी समाप्त झाली. एक महिन्याच्या मुदती नंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता परत एकदा मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आणि खासदार संभाजीराजे भोसले पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या वचनाची पुर्तता करावी अशी मराठा समाजाने मागणी केलीय. १७ जून रोजी मुंबईत मराठा समाजाचे कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि अन्य अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनाने सत्कारात्मक प्रतिसाद दर्शविला होता. मात्र महिना उलटून गेला तरी देखील मराठा समाजाचे प्रश्न जैसे थेच आहेत.

    मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अवधी मागितला होता. राज्य शासनाच्या विनंतीनुसार मूक आंदोलन एक महिना स्थगित करण्यात आले, ही मुदत १७ जुलै रोजी समाप्त झाली. एक महिन्याच्या मुदती नंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता परत एकदा मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    आरक्षण नसल्यानं समाज अडचणीत आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येतेय. तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्यात यावी, येत्या काळात आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास छत्रपती संभाजी राजे यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बीडमध्ये मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.