राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेखला अत्याचार प्रकरण भोवणार; बी-समरी अहवाल न्यायालयाने फेटाळले, पुन्हा नव्याने तपास करण्याचे दिले आदेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेखच्या अडचणीत वाढ झाली आहे. अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला बी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

    बीड : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेखच्या अडचणीत वाढ झाली आहे. अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला बी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

    न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत आरोपीने सांगितल्याप्रमाणे तपास केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. तक्रारदार तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला आहे. तसेच तक्रारदारालाच या प्रकरणात खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करावा. त्यात पोलीस आयुक्तांनी योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

    सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या प्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अ‍ॅड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित असून औरंगाबादेतील बायजीपुरा भागात भाड्याने राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला.

    मात्र, तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आरोप मेहबूब शेख याने समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले होते. पोलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आरोपी यांची भेट झाल्याबद्दलही शंका उपस्थित केली होती.