पंकजा मुंडेंच्या ट्विटची घेतली तातडीने दखल; पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीचे काम अखेर सुरू

पाटोदा शहराच्या नजीक या खराब झालेल्या रस्त्यांवरील भेगा बुजविण्याचे व दुरूस्तीचे काम कत्राटदाराने आजपासून सुरू केले आहे.

    बीड : पैठण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे पडलेल्या भेगा बुजविण्याचे आणि दुरूस्तीचे काम पाटोदा नजीक आजपासून हाती घेण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात निकृष्ट कामाचे फोटोसह ट्विट केल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची तातडीने दखल घेतली होती.

    पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ७५२ ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी नुकतच केलं होतं. शिवाय सोबत त्याचा एक फोटो देखील पोस्ट केला होता. या ट्वीटला लगेचच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलं होतं आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

    दरम्यान, पाटोदा शहराच्या नजीक या खराब झालेल्या रस्त्यांवरील भेगा बुजविण्याचे व दुरूस्तीचे काम कत्राटदाराने आजपासून सुरू केले आहे.