परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात बजावला अटक वॉरंट, ‘हे’ आहे कारण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट (Parali Court Issued Arrest Warrant To Raj Thackeray) बजावला आहे.

    परळी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट (Parali Court Issued Arrest Warrant To Raj Thackeray) बजावला आहे. जामीन करुनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. परळीमध्ये २००८ साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ  राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे. आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

    आठ वर्षांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईत मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नव्हते.दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत हजेरी लावली होती. न्यायालयात जाऊन त्यांनी त्यावेळी ३०० दंड भरत अटक वॉरंट रद्द केले होते. या प्रकरणी परळी न्यायालयाने जामीन दिला.

    रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. अंबाजोगाईत मनसैनिकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते. अंबाजाेगाई शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.