मराठवाड्यात पावसाचे धुमशान; बीडच्या मांजरा धरणाचे सहा दरवाजे दोन मीटरने पुन्हा उघडले

मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा धरण क्षेत्रातील भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पाणीसाठा वाढू लागल्याने धरणाचे सहा दरवाजे पुन्हा दोन मीटरने उचलण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

    बीड : मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा धरण क्षेत्रातील भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पाणीसाठा वाढू लागल्याने धरणाचे सहा दरवाजे पुन्हा दोन मीटरने उचलण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

    अतिपावसामुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना धरणातून पाणी सोडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे दरवाजे केवळ ०.२५ मीटर उंचीपर्यंत उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून मांजरा धरणा वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि धरणात ३५ हजार ८९३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु झाली.

    धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने धरणाचे सहा दरवाजे टप्प्याटप्प्याने दोन मीटरपर्यंत उचलण्यात आलेत. त्यातून नदीपात्रात सध्या ३५ हजार ९६८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यकता भासल्यास दरवाजे आणखी उघडण्यात येतील अशी माहिती देण्यात आलीय. त्यामुळे नदी काठच्या गावांचा पुराचा धोका अद्याप कमी झालेला नाही.