कमी पैशात सोने खरेदीचे आमिष, ४० लाख रुपयांची फसवणूक

परळी येथील एका सोन्याच्या दुकानदारास कमी पैशात सोने खरेदी करून देतो म्हणून तब्बल ४० लाख रुपयांची फसवेगिरी केल्याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीड : परळी येथील एका सोन्याच्या दुकानदारास कमी पैशात सोने खरेदी करून देतो म्हणून तब्बल ४० लाख रुपयांची फसवेगिरी केल्याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    बीड शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सोनार लाईन परिसरातील सोन्याचे दुकानदार फिर्यादी शंकर प्रभाकर शहाणे यांना आरोपी महादेव उध्दव गित्ते (रा. नंदागौळ) व प्रशांत भालेराव (रा. औरंगाबाद) या दोघांनी संगनमताने शंकर शहाणे यांना ८ ऑक्टोबर २०२० ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान कमी किमतीत सोने खरेदी करून देतो म्हणून ४० लाख रुपये घेतले.

    सोने देतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी महादेव गित्ते व प्रशांत भालेराव या दोघांवर शंकर शहाणे यांच्या फिर्यादिवरुन शहर पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.२०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळ करित आहेत.