Give crop insurance otherwise intense agitation, warning of farmers

हिंगोली जिल्ह्यातील आजेगांव, नागा सिनगी, सेनगांव, औंढासह जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणचे शेतकरी या पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत.

    हिंगोली : पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत गतवर्षीच्या २०२० – २१ च्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील ७६ हजार ११६ शेतकऱ्यांना ६३ कोटी सहा लाख रुपये विमापरतावा मंजूर झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तब्बल पावणेपाच पट जास्त विमा संरक्षण शेतकऱ्यांना शासनाने दिले आहे. परंतु, यात फक्त २५. १५ टक्के शेतकरी पीकविमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.

    पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पीक विम्याच्या लाभापासून अजूनपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकरी वंचित असल्याने तात्काळ पिक विमा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    हिंगोली जिल्ह्यातील आजेगांव, नागा सिनगी, सेनगांव, औंढासह जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणचे शेतकरी या पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. तरी, शासनाने तात्काळ याची दखल घेत पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.