कलावंतांच्या पाल्याची शैक्षणिक माफी करावी व पाल्यांना शैक्षणिक साहित्याचा खर्च द्यावा, प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्यावतीने धरणे आंदोलन

    हिंगोली (Hingoli) : लोककलावंतांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी हिंगोली यांना प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध मागण्यासाठी अनोख्या पद्धतीने धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

    कलावंत कल्याण मंडळ त्वरीत स्थापन करावे,सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कलावंतांच्या नावाची नोंद करावी, आमदार निधीतून तालुक्याच्या ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधावे, वृद्ध कलावंतांच्या पेन्शन योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात यावा, कलावंतांच्या पाल्याची शैक्षणिक माफी करावी व पाल्यांना शैक्षणिक साहित्याचा खर्च द्यावा, तसेच जागरण, गोंधळ, तमाशा, बँड बँजो, वारकरी संप्रदाय भजन, कीर्तन, प्रवचन, कवाली, कलापथक या समाज प्रबोधन करणार्‍या लोककलावंतांना त्वरित 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करावे अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले.

    यावेळी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष शेषराव कावरखे यांच्या उपस्थितीत गीत गायन करून हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे कलावंत हजर होते.