२१ बैलांची कत्तल होण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई; टेम्पोत करकचून बांधलेल्या जनावरांची केली सुटका

टेम्पोमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून असलेले तब्बल एकवीस बैल आढळून आले आहेत. यापैकी अनेक बैल हे जखमी अवस्थेत आहेत. ही  जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

    हिंगोली (Hingoli) : अत्यंत निर्दयपणे चार टेम्पोंमध्ये तब्बल 21 बैलांना (bullocks) कोंबून नेणार्‍या आरोपींना (the accused) टेम्पोंसह हिंगोलीच्या गोरेगाव पोलिस ठाण्याच्या (Goregaon Police Station) पथकाने पकडले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्यरात्रीनंतर आज भल्या सकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोरेगाव नजीक पोलिस पथकाने दोन टेम्पो पकडले आहेत.

    तर वाशिम ते हिंगोली महामार्गावर कनेरगाव नाका पोलिसचौकी पासून काही अंतरावर दोन टेम्पो पकडले आहेत. या टेम्पोमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून असलेले तब्बल एकवीस बैल आढळून आले आहेत. यापैकी अनेक बैल हे जखमी अवस्थेत आहेत. ही  जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

    जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.