pradnya satav

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव(Rajiv Satav) यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव(Dr. Pradnya Satav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या.

    नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची(Maharashtra Pradesh Congress) नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव(Rajiv Satav) यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव(Dr. Pradnya Satav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या. या अगोदर हिंगोलीत मी राजीवच्या साथीने काम करायचे पण आज मी एकटी पडलीय, अशावेळी राजीवला मिस करतीय, असं म्हणत त्यांनी राजीव यांच्या आठवणी जागवल्या.

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं १४ जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.

    प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर  त्यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच मिळालेली संधी मोठी आहे. कामाला मोठी स्पेस आहे. या कामात राजीवजींच्या कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ असेल. मी चांगलं काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी कठीण काळात माझ्या पाठीशी होते. आजही निवडीनंतर अनेकांचे फोन आले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं नेहमी मार्गदर्शन असतं. राज्यातील नेतेमंडळीही पाठीशी उभे आहेत. आता मिळालेल्या जबाबदारीनंतर आव्हान जरी मोठं असलं तरी कामाला संधी असल्याने उत्तम काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.