पोलिसांच्या सतर्कतेने जालन्यात नरबळीचा प्रकार टळला

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे शंभर वर्षे जुन्या घरामध्ये गुप्तधन असल्याच्या लालसेने एका मांत्रिक महिलेच्या मदतीने दोघांनी नरबळी देण्याचे नियोजन केले होते. गुप्तधनाची लालसा असलेल्या पतीला विरोध करीत पत्नीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तत्परतेने पावले उचलल्यामुळे नरबळीचा प्रयत्न फसला.

  जालना : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे शंभर वर्षे जुन्या घरामध्ये गुप्तधन असल्याच्या लालसेने एका मांत्रिक महिलेच्या मदतीने दोघांनी नरबळी देण्याचे नियोजन केले होते. गुप्तधनाची लालसा असलेल्या पतीला विरोध करीत पत्नीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तत्परतेने पावले उचलल्यामुळे नरबळीचा प्रयत्न फसला.

  नेमकं काय घडलं?

  डोणगाव येथील संतोष पिंपळे याचे राहते घर शंभर वर्षांपूर्वीचे आहे. या घरात पिंपळे कुटुंबीयांचे पाच पिढ्यांपासून वास्तव्य आहे. दरम्यान, निजामकालीन डोणगाव ही बाजारपेठ असल्याने या ठिकाणी जुन्या घरांमध्ये गुप्तधन असल्याची गावात कायम चर्चा असते, याच गुप्तधनाच्या लालसेपोटी संशयित संतोष पिंपळे व गावातील संशयित जीवन पिंपळे यांनी घरातील गुप्तधन काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील उंबरखेड (ता. देऊळगाव राजा) येथील एक मांत्रिक महिला त्यांना मदत करीत होती. शनिवारी (ता.१९) त्या महिलेने प्रकाश पडतो या ठिकाणी गुप्तधन आहे असे संतोष पिंपळे याला सांगितले . हे धन मिळवण्याच्या लालसेतून या दोघांनी नरबळी देण्याचे ठरविले.त्यानुसार सोमवारी असलेल्या पौर्णिमेला संतोष पिंपळे याने पत्नी सीमा पिंपळे हिला गुप्तधन असल्याच्या ठिकाणाची पूजा करण्याचे सांगितले. परंतु तिने यासाठी नकार दिला. त्यामुळे संतोषने तिला मारहाण केली. या प्रकारामुळे सीमा वाटूर येथे माहेरी वडिलांकडे निघून गेली.दरम्यान आपले पती गुप्तधनासाठी नरबळी देत असल्याची माहिती तिने वडिलांना दिली.

  त्यानंतर सीमा पिंपळे व तिचे वडील यांनी टेंभुर्णी पोलिस ठाणे गाठले व या संदर्भात सविस्तर माहिती सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून श्री.ठाकरे यांनी तातडीने पथक डोणगाव येथे रवाना केले. त्या ठिकाणी त्यांना जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. जीवन पिंपळे व संतोष पिंपळे या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, हे दोघे दोन नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांना मिळाली. या कामी मदत करणाऱ्या मांत्रिक महिलेला उंबरखेड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे, किरण निर्मल, पंडित गवळी, गणेश पवार, गजेंद्र भुतेकर, महिला पोलिस कर्मचारी छाया निकम, सागर शिवरकर, महेश वैद्य यांनी केली.

  दरम्यान याप्रकरणी संतोष पिंपळे जीवन पिंपळे व एक मांत्रिक महिला यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना पोलिस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी (ता.२६) सांगितले.

  संतोष याचा दोन नरबळी विचार होता. यात पहिला बळी तुझाच देतो, असे रागात पत्नी सीमा हिला म्हटले. त्यामुळे घाबरून सीमा माहेरी निघून गेली, मात्र आपल्या चार मुलांपैकी एकाचा पती संतोष बळी देऊ शकतो, अशी शंका तिला आली. त्यामुळे तिने हा सर्व प्रकार माहेरी कानी घातला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

  गावात शंभरावर खड्डे

  निजामकालीन बाजारपेठ असल्याने डोणगाव येथे गुप्तधन असल्याचे अनेक आख्यायिका आहेत.दरम्यान गुप्तधनासाठी येथील विविध भागांमध्ये १०० पेक्षा जास्त खड्डे खोदले असल्याचे दिसून आले अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक श्री ठाकरे यांनी दिली.