काॅंग्रेस निवडणुकीला घाबरली, षडयंत्र करून लोकशाहीचा खून, संभाजी पाटील निलगेंकरांचा आरोप

लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी काॅंग्रेसच्या नेत्यांनी षडयंत्र रचून निवडणुकच होऊ द्यायची नाही हे ठरवले होते. जिल्हाधिकाऱ्यांपासून प्रशासनातील अनेकांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बॅंकेच्या पाच लाख सभासद शेतकऱ्यांचा विश्वास घात केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.

  लातूर : लातूर जिल्हा बॅंकेचा कारभार आम्ही चांगल्या पद्धतीने केला, बॅंक नफ्यात आणली असा दावा करणाऱ्या काॅंग्रेसच्या नेत्यांनी षडयंत्र रचून निवडणुकच होऊ द्यायची नाही हे ठरवले होते. जिल्हाधिकाऱ्यांपासून प्रशासनातील अनेकांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बॅंकेच्या पाच लाख सभासद शेतकऱ्यांचा विश्वास घात केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला.

  संभाजी पाटील निलंगेकर नेमकं काय म्हणाले?

  आमदार धीरज देशमुख, बाबासाहेब पाटील, अशोक पाटील निलंगेकर यांनी घरी गेल्यानंतर आरशा समोर उभे राहून स्वतःला प्रश्न विचारावा, आपण खरच प्रामाणिकपणे निवडून आलो आहोत का? जे सत्करा आपण स्वीकारत आहोत, त्याचा आपल्याला अधिकार आहे का? असा सवाल देखील निलंगेकर यांनी उपस्थित केला. तसेचं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपसह बंडखोर व इतर विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे काॅंग्रेसच्या सहकार पॅनलचे पाच उमेदवार बिनविरोध आल्याचा दावा सोशल मिडियाच्या माध्यमातून केला जातोय. बिनविरोध निवड झाल्याबद्दल विजयी संचालक सत्कार देखील स्वीकारत आहेत. याचा संदर्भ देत संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅंग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

  निवडणुकीला काॅंग्रेस का घाबरली?

  सोशल मिडियाच्या माध्यमातून या संपुर्ण प्रकारावर संताप व्यक्त करतांना निलंगेकर म्हणाले, बॅंकेतील सत्ताधारी आणि जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांनी लातूरची जनता आणि बॅंकेच्या पाच लाख शेतकरी सभासदांसोबत धोका केला आहे. बॅंकेचा कारभार चांगल्या केल्याचा दावा केला तर मग निवडणुकीला काॅंग्रेस का घाबरली असा सवाल संभाजी पाटील यांनी केला आहे. तसेचं पाच लाख सभासद शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेत सोसायट्याच्या चेअरमनांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे ठरवले. आठशे मतदारांची यादी देखील काॅंग्रेसच्याच नेत्यांनी केली. मग एवढे करूही तुम्हाला भिती का वाटत होती? विरोधकांना उमेदवारही मिळणार नाही, असे सांगणारे काॅंग्रेसचे नेते घाबरले जेव्हा भाजपने सगळ्या जांगावर चाळीस उमेदवारी अर्ज दाखल केले. असंही ते म्हणाले.

  यात जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळेच सामील

  अनूमोदकाची संख्या मोजता आमच्याकडे १२० लोक आहेत, हे समजल्यावर काॅंग्रेसच्या नेत्यांना घाम फुटला. मतदान झाले तर सत्ता जाईल या भितीतूनच हे षडयंत्र रचले गेले. आमच्या उमेदवारांनी सर्व अर्ज योग्यपद्धतीने भरले होते. पण अधिकाऱ्यांना हातीशी धरून कुणाचे शंभर, दोनशे रुपये थकबाकी आहे, असे दाखवून अर्ज बाद केले गेले. यात जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळेच सामील आहेत. आम्ही तक्रार करण्यासाठी फोन केले तर जिल्हाधिकारी गायब होते, अधिकारी फोन घेत नव्हते. हा सगळा प्रकार आणि लोकशाहीचा खून पुर्वनियोजित कार्यक्रम होता, असा आरोप देखील संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. या षडयंत्राच्या विरोधात आम्ही न्यायालयात तर जाणार आहोतच, पण काॅंग्रेस नेत्यांच्या या कटात प्रशासनातील जे जे अधिकारी होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखर करावेत, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमचे एक शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांची भेट घेऊन करणार आहेत, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.