दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत शेतात काम करू नका; लातूर जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये, कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली / पाण्याच्या स्त्रोताजवळ / विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    लातूर : पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये, कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली / पाण्याच्या स्त्रोताजवळ / विदयुत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

    दरम्यान मांजरा प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरु असल्याने हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी मांजरा नदी व्दारे तसेच कालव्यातून ठरवलेल्या नियमाप्रमाणे सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मांजरा नदीवरील बॅरेजेस देखील पूर्णपणे भरले असून धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडल्यास तसेच येणारा पाण्याचे आवक वाढत राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मांजरा नदी वरील सर्व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

    संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता

    पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने व जिल्हयातील काही मध्यम प्रकल्प / बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत व काही मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली असून परिस्थितीनुरुप केंव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क रहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.