लातूर जिल्हा बॅंकेत बिनविरोधची परंपरा कायम, विरोधकांचे अर्ज बाद, तर याप्रकरणी राज्‍यापालांकडे तक्रार करणार, आ. रमेश कराड यांची माहिती

लातूर जिल्हा बॅंकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी काॅंग्रेस-महाविकास आघाडीच्या पॅनलने बिनविरोधसाठी सुरू केलेले प्रयत्न यशस्वी झालेले दिसतायत. धीरज देशमुख यांच्यासह सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपासह सर्व विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद करण्‍याचे षडयंत्र रचून लोकशाहीचा खुन केला आहे असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी केला आहे.

  लातूर : लातूर जिल्हा बॅंकेची निवडणूक ही गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध होत आली आहे. ३०-३५ वर्षांपासून या बॅंकेवर आधी स्व. विलासराव देशमुख आणि त्यांच्यानंतर त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख यांनी ही बॅंक एकहाती सांभाळली. आता काका दिलीपराव हे देखील बॅंकेच्या राजकारणातून बाजुला झाले आहेत, त्यांनी पुतण्या आमदार धीरज देशमुख यांच्या हाती बॅंकेची सुत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला. बॅंकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी काॅंग्रेस-महाविकास आघाडीच्या पॅनलने बिनविरोधसाठी सुरू केलेले प्रयत्न यशस्वी झालेले दिसतायत. धीरज देशमुख यांच्यासह सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

  गतवर्षी विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये, सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची अर्ज बाद करून संचालक मंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध म्हणून त्यांनी विजय प्राप्त केला होता त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा सुरु आहे.

  दरम्यान आता बॅकेची निवडणूक होणे अपेक्षित असले तरी यातील विरोधकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅकेंवर कॉंग्रेसने बिनविरोध ताबा मिळवला आहे. असे असले तरी आता विरोधकही चांगलेचं आक्रमक झाले आहेत. भाजपासह सर्व विरोधी उमेदवाराचे अर्ज बाद करण्‍याचे षडयंत्र रचून लोकशाहीचा खुन केला आहे असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी केला आहे. तसेचं हुकूमशाही पध्‍दतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची परवानगी मिळावी यासाठी राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल आणि केंद्रीय सहकारमंत्री मा. अमित शहा यांची भेट घेणार आहोत अशी माहिती भाजपचे कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  रमेश कराड नेमकं काय म्हणाले?

  आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूकीसाठी गेल्‍या ११ ते १८ ऑक्‍टोबर दरम्‍यान उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यात आले. या अर्जाची २० ऑक्‍टोबर रोजी छाननी होवून भाजपासह सर्व विरोधी उमेदवारांचे सहकार बोर्डाच्‍या बेबाकीसह इतर किरकोळ कारणावरून अर्ज बाद करण्‍याचे कटकारस्‍थान अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्‍ताधाऱ्यांनी केले असा आरोप कराड यांनी केला. तसेचं बँकेत तुमचे चांगले काम होते तर लोकशाही पध्‍दतीने निवडणूकीला सामोरे जायला हवे होते मात्र तसे घडले नाही. बँकेच्‍या संचालक मंडळ निवडणुकीच्‍या सर्व जागा लढण्‍याची पुर्णपणे तयारी आम्‍ही केली होती. बँक आमच्‍या ताब्‍यात येणार होती याची कुणकूण लागल्‍याने सर्व विरोधकाचे अर्ज बाद करण्‍यात आले. हिम्‍मत असेल तर निवडणुक होवू द्या. मतदाराने दिलेला कौल आम्‍हाला मान्‍य असेल पण निवडणुक टाळून मतदारांच्‍या अधिकारावर का गधा आणता असा सवाल आ. रमेश कराड यांनी उपस्थित केला.

  अर्ज बाद ठरविण्‍याची बेकायदेशिर प्रक्रिया सत्‍ताधाऱ्यांच्‍या दबावाखाली

  बँकेची निवडणूक होवू द्यायची नाही. यासाठी विरोधी उमेदवारांना सोसायटी व इतर सर्व कागदपत्रे उपलब्‍ध होण्‍यास अडचणी निर्माण केल्‍या गेल्‍या. २० ऑक्‍टोबर रोजी छाननीच्‍या वेळी अनेक अडचणीवर मात करून मिळविलेले बेबाकी प्रमाणपत्र दाखल करून घेण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे विरोधकांचे अर्ज बाद ठरविण्‍याची बेकायदेशिर प्रक्रिया सत्‍ताधाऱ्यांच्‍या दबावाखाली अधिकाऱ्यांनी पार पाडली आहे. सत्‍ताधारी पॅनचे उमेदवार धिरज देशमुख, बाबासाहेब पाटील, गोविंद बोपनीकर यांच्‍यावर विरोधकाकडून गंभीर स्‍वरूपाचे आक्षेप छाननीच्‍या वेळी घेतले. त्‍यावर कुठलीही चर्चा न होता विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावण्‍यात आले. २२ ऑक्‍टोबर दुपारी ५ पर्यंत अर्ज बाद केल्‍याची कारणे लेखी स्‍वरूपात उमेदवारांना प्रशासनाने दिली नाहीत. जर ही माहिती उद्या मिळाली तर शनिवार रविवारच्‍या सुट्या असल्‍याने उपविभागीय सहनिबंधकाकडे ३ दिवसाच्‍या आत अपिल करावे लागते. ते अपिल करता येवू नये अशी व्‍युहरचना सत्‍ताधाऱ्यांनी केली असल्‍याचा आरोपही आ. रमेश कराड यांनी केला आहे.

  राज्‍यपाल आणि मंत्री अमित शहा यांना माहिती देणार – आ. कराड

  आठ दिवस दिवाळीमुळे न्‍यायालय बंद राहणार असल्‍याने नेमकी दाद मागता येणार नाही त्‍यामुळे या निवडणूक प्रक्रियेची सविस्‍तर माहिती राज्‍याचे महामहीम राज्‍यपाल मा. भगतसिंहजी कोशारी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना देवून सत्‍ताधाऱ्यांच्‍या हातचे भाऊले बनून लोकशाहीचा खुन करणाऱ्या अधिकाऱ्यां विरूध्‍द फौजदारी गुन्‍हे दाखल करण्‍याची मागणी करणार आहोत अशी माहितीही भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी यावेळी बोलताना दिली.