उशीरा पेरणी झालेले सोयाबीन पडेल पदरात, ‘अशी’ घ्या काढणीची काळजी

जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या सोयाबीनचे पावसाने मोठे नुकसान झालेले आहे. दरम्यान या सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत. मात्र, हिरव्या शेंगा असलेल्या सोयाबीनचे पिक पदरात पाडून घेता येणार आहे. हिरवे असलेल्या सोयाबीनच्या शेंगाचा रंग हा पिवळसर किंवा तांबूस झाल्यानंतर त्याच्या काढणीला सुरवात करणे योग्य राहणार आहे. त्यामुळे काढणी आणि त्यानंतर घ्यावयाची काय काळजी हे आपण समजून घेणार आहोत.

  लातूर : पावसामुळे खरीपातील सोयाबनचे मोठे नुकसान हे झालेले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीनची उशिराने पेरणी केली आहे त्या पिकातून शेतकऱ्यांना उत्पादन मिळू शकते असा अंदाज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विद्यापीठातील प्रा. संतोष शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या सोयाबीनचे पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.

  दरम्यान या सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत. मात्र, हिरव्या शेंगा असलेल्या सोयाबीनचे पिक पदरात पाडून घेता येणार आहे. हिरवे असलेल्या सोयाबीनच्या शेंगाचा रंग हा पिवळसर किंवा तांबूस झाल्यानंतर त्याच्या काढणीला सुरवात करणे योग्य राहणार आहे. त्यामुळे काढणी आणि त्यानंतर घ्यावयाची काय काळजी हे आपण समजून घेणार आहोत.

  उघडीप दिल्यावर 10 दिवसांमध्ये काढता येणार

  पावसामुळे सोयाबीनचे पीक सध्याही पाण्यातच आहे. यंदाच्या हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेले सोयाबीनच्या शेंगा ह्या परीपक्व झाल्या होत्या. ऐन काढणीच्या प्रसंगीच पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तर शेंगालाच कोंभ फुटण्याचे प्रमाण हे वाढले आहे. त्यामुळे पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन हातचे गेले आहे. पण जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेले सोयाबीन अजूनही हिरवे आहे. हे सोयाबीन पाण्यात असले तरी पावसाने उघडीप दिल्यावर 10 दिवसांमध्ये काढता येणार आहे. त्यामुळे यंदा नुकसान अधिकचे असले तरी काही प्रमाणात का होईना योग्य पध्दतीने काढणी केली तर शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन मिळेल असे प्रा. संतोष शिंदे यांनी सांगितले आहे.

  काढणीवेळी काय काळजी घ्यावी?

  शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या परीपक्वतेनुसार 100 ते 110 दिवसांनी काढणी करणे आवश्यक आहे. काढणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली तर दरम्यानच्या काळात सोयाबीन वाळवले तर अधिकचा फायदा होणार आहे. मळणी करताना मळणी यंत्राची गती ही 400 आरपीएम एवढीच असणे आवश्यक आहे. अन्यथा बियाणांचे आवरण हे खराब होते व त्याचा परिणाम सोयाबीनच्या दर्जावर होणार आहे. शिवाय बिजोत्पादनादरम्यान बीया ची उगवण ही नीट होणार नाही.

  यंदा किती हेक्टरावर सोयाबीनची पेरणी?

  सोयाबीन हे नगदी पिक असून शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढत आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनचा पेरा हा 43 लाख हेक्टरावर करण्यात आला होता. पण मराठवाड्यास सरासरी पेक्षा दीडपट पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान हे झाले आहे. किमान ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला अजून अवधी आहे त्या शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने काढणी करणे गरजेचे आहे.

  …तर सोयाबीनचे उत्पादन मिळू शकते

  मळणी झालेल सोयाबीन हे सावलीमध्ये वाळवावे..वाळवताना थराची जाडी ही 5 सेंटीमिटरपेक्षा अधिक असू नये. अन्यथा आर्द्रता वाढून बुरशीचा धोका निर्माण होतो. कडक उन्हामध्ये सोयाबीन वाळवल्यास बियाणाच्या उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होणार आहे. साठवणुकी दरम्यान मॉश्चरचे प्रमाण हे 8 ते 10 टक्केच असणे गरजेचे आहे अन्यथा किडीचे प्रमाण वाढण्याचा धोका होतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशिराने पेरणी केलेली आहे त्या सोयाबीनचे उत्पादन मिळू शकते.