किरीट सोमय्या 26, 27 तारखेला नांदेडला येणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट योमय्या यांनी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर आणणार असं वक्तव्य नुकतंच केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न विचारला जातोय.

  नांदेड : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट योमय्या यांनी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर आणणार असं वक्तव्य नुकतंच केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी सोमय्या नांदेडला येणार आहेत, असं सांगितलं आहे.

  दरम्यान आधी किरीट सोमय्या यांचं सूचक वक्तव्य आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या रडारवर असलेला नांदेडमधील तो बडा नेता कोण ? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

  चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

  ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. माझ्या हसण्यावरुन समजून जा, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज पुन्हा ईडीच्या कारवायाबाबत तुम्हाला कसं कळत असं मंत्री अशोक चव्हाण यांनी विचारलं. येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत. करा बातमी मोठी, असं पाटील म्हणाले.

  पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता ईडीच्या रडारवर नेमकं कोण असं विचारलं जात आहे. तसेच दिवाळी झाली की एका बड्या नेत्याचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनीही आजच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील तसेच किरीट सोमय्या या दोघांच्याही वक्तव्यानंतर आता ईडीच्या रडारवर असलेला नांदेडमधील बडा नेता कोण असावा याचे अंदाज बांधले जात आहेत.

  मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार

  देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काहीही झालं तरी ही जागा खिशात घालणारच असं चंग भाजप तसेच काँग्रेसने बांधला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असं वक्तव्य केल्याममुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोप करुन देगलूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसमोर अडचणी निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

  आता कोणाचा नंबर ?

  किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूसन ते मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल परब अशी ही मोठी यादी आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर लगेच ईडी, आयकर विभाग अशा तपास संस्थांची चौकशी या नेत्यांच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता कोणाचा नंबर ? कोण तपास संस्थांच्या रडारवर ? असं विचारलं जाऊ लागलंय.