निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या रागातून २२ वर्षीय युवकाची हत्या

आमच्या विरोधात विरोधी गटाचा प्रचार का केलास असे म्हणत  आरोपींनी विटा व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्यात डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला

    नांदेड: राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीतूनच अनेकआरोप -प्रत्यारोपबरोबरच हाणामारीच्या घटनाही घडल्या. मात्र नांदेडमधील देगलूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील वादातून २२ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या युवकाचे नाव योगेश विश्वनाथ धर्माची असे असून,  शेतातून घरी येत असताना तू निवडणुकीत आमच्या विरोधात विरोधी गटाचा प्रचार का केलास असे म्हणत  आरोपींनी विटा व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्यात डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेश याचा खून निवडणुकीच्या वादातूनच झाल्याची माहिती योगेशच्या वडिलांनी दिली आहे.

    या घटनेने देगलूरमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. गावात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊनये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदण्यावण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.