फडणवीस यांच्या ओबीसी आरक्षणासाठी राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेवर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांचे टिकास्त्र !

भाजपने ओबीसीच्या आरक्षणावरून शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. त्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते.

  नांदेड : महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आव्हान देताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता दिल्यास चार महिन्यात ओबीसींची राजकीय आरक्षण परत मिळवून दाखवू अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा काल केली होती. त्यावरून आता सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

  ओबीसीच्या आरक्षणावरून राज्यव्यापी चक्काजाम

  भाजपने ओबीसीच्या आरक्षणावरून शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. त्यात चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आदी भाजप नेत्यांच्या नेतृत्वात हजारो भाजप कार्यकर्ते विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले होते.

  तुम्हाला सत्तेत येण्याची गरज नाही

  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, सत्तेत आल्यानंतर ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, आम्ही प्रश्न सोडवू. त्यासाठी तुम्हाला सत्तेत येण्याची गरज नाही. कारण तुम्हाला जनतेनेच नाकारले आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीसांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, आम्ही त्यांना श्रेय देण्यास तयार आहोत असे म्हटले  आहे.

  धनगर आरक्षणावरही असेच बोलले होते

  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवर टिका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, अशी टिका राऊत यांनी केली आहे.