महाविकास आघाडी सरकाराच्या विरोधातील रोष, आक्रोश मतदार या पोटनिवडणुकीत व्यक्त करतील – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

सरकारकडून एक नवी दमडी मराठवाडा किंवा नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळाली नाही. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी सगळी पिके उद्ध्वस्त झाली. दस्तूरखुद्द पालकमंत्री शेतकऱ्यांची दु:खे समजून घ्यायला शेताच्या बांधावर गेले नाहीत. आम्ही त्या ठिकाणी दौरा केला. अशा या निष्क्रिय सरकार, निष्क्रिय मंत्री याची राजवट या ठिकाणी चालू असतानाही देगलूरची पोटनिवडणूक या ठिकाणी होतेय

    नांदेड: बेईमानी करुन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षांचे नेते आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत, कोणाची ईडीची चौकशी सुरु आहे, तर कोणावर आयकर विभागाचा छापा पडला आहे. तसेच कोणाचा जावई एनसीबीच्या चौकशीत अटकेत आहे, त्यामुळे हे सरकार पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पूर्णपणे बदनाम झालेले आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधातील चीड, आक्रोश, नाकर्तेपणावरील राग देगलूरची जनता दाखवून देईल व भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज व्यक्त केला.

    नांदेड येथे विरोधी पक्ष नेते दरेकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतना त्यांनी सांगितले की, पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीने सुभाष साबणे यांना या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. निश्चितच सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. आज आपल्या माध्यमातून निश्चितच विश्वास देतो की, पंढरपूरच्या अभूतपूर्व अशा विजयानंतर देगलूर विधानसभेवरसुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, ज्या वेळी पंढरपूर विधानसभेची पोट निवडणूक झाली त्या वेळी भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष एकवटले होते. सरकारी यंत्रणाही एकत्र आली होती, तरीही पंढरपूरच्या जनतेने भाजपाला कौल दिला. जनता भाजपाच्या बाजूने आहे हे दाखवून दिले. त्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभेच्या माध्यमातून सांगितले होते, की आपण पंढरपूरची निवडणूक आम्हाला जिंकून द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करील. त्याचप्रमाणे जर देगलूर विधानसभेची पोट निवडणूक जिंकून दिल्यानंतर त्या करेक्ट कार्यक्रमवार शिक्कामोर्तब होईल अशा प्रकारची ही महत्त्वाची ही निवडणूक असेल असेही त्यांनी सांगितले.
    भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारची २ वर्षांची निष्क्रिय कारकीर्द आणि सरकारचा लेखाजोखा देगलूरची जनता महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणार आहे. राज्य सरकारचा दोन वर्षाचा कालावधी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाचा कालावधीची जर तुलना केली तर दोन वर्षात कुठल्याही प्रकारचे महाराष्ट्राच्या विकासाचे काम झालेले नाही. उलटपक्षी विकासाच्या ज्या योजना होत्या त्या बंद करण्याचे काम, स्थगित करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. दोन वर्षात कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्र पूर्णपणे विकासापासून वंचित राहिला. त्यात सर्वाधिक मराठवाडा वंचित राहिला आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा या ठिकाणी राहिला. मराठवाडा वॉटरगीडसारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याला फडणवीस साहेबांनी अंतिम स्वरूप दिले, प्रशासकीय मान्यता दिली तोही प्रकल्प राज्य सरकारने अर्धवट ठेवल्याची टिका दरेकर यांनी केली.

    समुद्रातील पाणी उचलून आणण्याचा प्रकल्पही अर्धवट ठेवला. मराठवाडा विकास महामंडळ रद्द केले गेले. एकंदरच मराठवाड्याविषयीची या सरकारची अनास्थाच दिसून आली. त्यामुळे सरकारच्या विरोधात वातावरण या ठिकाणी निश्चित निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली, आम्ही नांदेड जिल्ह्याचाही दौरा केला. पूर्णपणे येथील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. सुमारे आठ लाख शेतकरी बाधित झाले आहेत. साधारण पाच-साडेपाच हेक्टरच्या आसपास जमीन बाधित झाली आहे. पण सरकारकडून एक नवी दमडी मराठवाडा किंवा नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळाली नाही. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी सगळी पिके उद्ध्वस्त झाली. दस्तूरखुद्द पालकमंत्री शेतकऱ्यांची दु:खे समजून घ्यायला शेताच्या बांधावर गेले नाहीत. आम्ही त्या ठिकाणी दौरा केला. अशा या निष्क्रिय सरकार, निष्क्रिय मंत्री याची राजवट या ठिकाणी चालू असतानाही देगलूरची पोटनिवडणूक या ठिकाणी होतेय आणि सुभाष साबणे ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांना भाजपाने उमेदवारी दिली, त्यामुळे देगलूरची जनता निश्चितपणे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करील, असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
    आज देगलूरमध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री नाही जेणेकरून इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल तेलंगणा, कर्नाटक मध्ये येथील तरुणांना नोकरी, रोजगारासाठी जावे लागते. म्हणजे तुम्ही ना शेतकऱ्यांना समाधान देत, ना बेरोजगारांच्या हाताला काम देत. इथले, रस्ते, पाणी, सिंचन कंशालाही हातभार लावत नाही. मग लोकांनी तुम्हाला मते कशासाठी द्यायची?, असा सवालही दरेकर यांनी आघाडी सरकारला विचारला.