महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी उध्वस्त केला : ॲड. रेवण भोसले

विदर्भ-मराठवाड्यात महापूर आला, कोकणला चक्रीवादळाचा तडाखा बसला ,टोळधाड आली, मरणाऱ्यांची प्रेतही नातेवाईकांच्या ताब्यात आली नाहीत, जी आली त्यांचे अवयव काढून घेतले होते, अवकाळी पावसाने हातात तोंडासी आलेला घास हिरावून घेतला तरीही शेतकऱ्याला काही मदत सरकार करायला तयार नाही परंतु मंत्र्यांच्या बंगल्याला वीज सवलत मिळाली ,आमदारांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले, इतकेच नाही तर माजी आमदार ,मंत्री यांना ४० टक्के पेन्शन वाढ झाली.

  उस्मानाबाद  : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहेत. अगोदरच लॉकडाऊन  व कोरोनाच्या संकटात अडचणीत आलेला शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या थापेबाजी व नाकर्तेपणा ला कंटाळून आत्महत्या करत आहे, त्यामुळे घोटाळेखोर व हप्तेवसुली महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाल्याचा आरोप जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अँड रेवण भोसले यांनी केला आहे.

  शेतकऱ्यांची संपूर्ण बिनशर्त कर्जमाफी करा

  भोसले यानी म्हटले आहे की, शेतकरी व आपत्तीग्रस्त, ज्यांचे घरदार, संसार वाहून गेले ते संकटाच्या डोंगराखाली आहेत, त्यातच अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले ,त्यांना अद्यापही सरकार मदत करण्याऐवजी फक्त राजकारण करण्यातच गुंतले आहे. राज्यात अतिवृष्टी ,अवकाळी व ओला दुष्काळ असतानाही शासन त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज  आणि बिनशर्त कर्जमाफी केली तरच पुन्हा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील अन्यथा अशा प्रकारच्या महाभयंकर संकटामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील.

  सरसकट पन्नास हजार दिवाळीपूर्वी जमा करा

  विदर्भ-मराठवाड्यात महापूर आला, कोकणला चक्रीवादळाचा तडाखा बसला ,टोळधाड आली, मरणाऱ्यांची प्रेतही नातेवाईकांच्या ताब्यात आली नाहीत, जी आली त्यांचे अवयव काढून घेतले होते, अवकाळी पावसाने हातात तोंडासी आलेला घास हिरावून घेतला तरीही शेतकऱ्याला काही मदत सरकार करायला तयार नाही परंतु मंत्र्यांच्या बंगल्याला वीज सवलत मिळाली ,आमदारांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले, इतकेच नाही तर माजी आमदार ,मंत्री यांना ४० टक्के पेन्शन वाढ झाली.

  तर दुसरीकडे शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना मात्र शेतकऱ्यांना करावा लागतो, त्यामुळे  महाविकास आघाडी सरकारने नुसत्या थापा व पोकळ घोषणा करण्यापेक्षा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट पन्नास हजार रुपये दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणीही ॲड भोसले यांनी केली.