शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी उस्मानाबाद मध्ये आज ऊस परिषद; राजू शेट्टी उतरणार मैदानात

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी राजू शेट्टी हे आता मैदानात उतरणार आहेत. वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. आज होणाऱ्या या कार्यक्रमास नुकसानग्रस्त शेतकरी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या संघटनेस उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे .

    उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाघोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे ऊस परिषद घेणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब, उस्मानाबाद या तालुक्यांसह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेली खरिपाची पिकं वाहून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. हे शेतकरी सध्या मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसले आहेत. त्यामुळे ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे.

    राजू शेट्टी आता आक्रमक होणार

    मराठवाड्यात झालेले नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासोबतच उसाची एक रकमी एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या सोबतच काही इतर लहान लहान मागण्या या शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे केलेल्या होत्या. याच अनुषंगाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी राजू शेट्टी हे आता मैदानात उतरणार आहेत.

    दरम्यान याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आता काय भूमिका घेणार? काय बोलणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज होणाऱ्या या कार्यक्रमास नुकसानग्रस्त शेतकरी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या संघटनेस उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले आहे .