कुठंपर्यंत शांत बसायचं, राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो; शिवसेना खासदार संजय जाधव यांचा गंभीर इशारा

परभणीत आता सेना विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे. माकडीणीवर जेव्हा स्वतः बुडण्याची वेळ येते तेव्हा ती पिल्लांना पायाखाली घालते हे लक्षात ठेवा. राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.

  परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांची नियुक्ती परभणीच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती केल्यानंतर मात्र शिवसेनेचे खासदार नाराज असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

  दरम्यान त्यामुळे परभणीत आता सेना विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे. माकडीणीवर जेव्हा स्वतः बुडण्याची वेळ येते तेव्हा ती पिल्लांना पायाखाली घालते हे लक्षात ठेवा. राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.

  संजय जाधव नेमकं काय म्हणाले?

  काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी बदला म्हणून शिफारस केली. पण राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं रान उठवलं की मी काही अपराधच केलाय. पण तरीही मी मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य केला आहे, असंही संजय जाधव म्हणाले.

  शेवटी आता मी खूप सहनशक्ती पलिकडे गेलोय. शेवटी काही मर्यादा असतात, कुठं पर्यंत शांत बसायचं, कुठं पर्यंत सहन करायचं, असं भावनिक वक्तव्य त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात केलं आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना खासदार नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिंतू मानवत बाजार समितीच्या अशासकिय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनाच्या नेत्यांमध्ये तू तू मै मै झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांनी बाजार समितीच्या अशासकिय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती.