पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूत म्हणून जनतेची सेवा करणार: केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन

डॉ.कराड म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी ग्रामीण भागामध्ये वीज, पाणी, रस्ते, पक्की घरे, स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस अशा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांमुळे हे शक्य झाले आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामान्य माणसाला विकासाची फळे मिळू लागली आहेत. 

    परभणी: पंतप्रधान मोदी यांनी गेल्या सात वर्षांत ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेतुन विकास केला. त्याचबरोबर दहशतवाद्यांचा बीमोड करत देश सुरक्षितही ठेवला. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा दूत म्हणून आपण जनतेची सेवा करणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी आ. मेघना बोर्डीकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, यात्रा संयोजक मनोज पांगारकर, सह-संयोजक प्रविण घुगे, माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम आदी उपस्थित होते.

    मराठवाड्याच्या विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न

    डॉ.कराड म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी ग्रामीण भागामध्ये वीज, पाणी, रस्ते, पक्की घरे, स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस अशा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांमुळे हे शक्य झाले आहे. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामान्य माणसाला विकासाची फळे मिळू लागली आहेत.

    मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी सरकारने व फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला. मात्र, महाविकास आघाडी सरकार सूडाने वागून मराठवाड्याच्या विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न करत आहे असेही डॉ. कराड म्हणाले.