भूमाफियांवर पोलीस कारवाई करत नसल्याचा आला राग; संतप्त तरूणाने थेट पोलीस आयुक्तांची गाडीच फोडली

माफियांवर पोलीस कारवाई करत नसल्याच्या रागातून एका २८ वर्षीय तरुणाने चक्क पोलीस आयुक्तांच्या गाडीची काच फोडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विशाल श्रावण मस्के (२८, रा. स्वराज नगर, बाळापूर फाटा) असे तरुणाचे नाव आहे.

    छत्रपती संभाजीनगर : भूमाफियांवर पोलीस कारवाई करत नसल्याच्या रागातून एका २८ वर्षीय तरुणाने चक्क पोलीस आयुक्तांच्या गाडीची काच फोडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विशाल श्रावण मस्के (२८, रा. स्वराज नगर, बाळापूर फाटा) असे तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मानसिक स्थिती ढासळलेला माणूस असून, त्याचा बाकी काही हेतू नसल्याचे प्राथमिकरित्या दिसत असल्याचे आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

    विशाल मस्के हा सायंकाळी पोलीस आयुक्तालयात आला. येताना त्याने पिशवीत दोन विटा आणल्या होता. यातील एक वीट त्याने आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर मारली. त्यात दरवाज्याची काच फुटली, तर दुसरी वीट त्याने पोलीस आयुक्तांच्या गाडीवर (एमएच २० जीई ०४८६) फेकून डाव्या बाजूच्या पुढील दरवाजाची काच फोडली. ही घटना म्हणजे पोलीस खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर हल्ला असल्याने, आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

    आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर नेमके प्रकरण काय आहे, याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली होती. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपासून चकरा मारतोय. मात्र, कुणी तक्रार घेतली नाही, असे तो सांगत होता. बेगमपुरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.