बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरीता तोंडाला काळे फासून केडीएमसीवर माेर्चा

सर्वेक्षण पोलीस संरक्षणात केले जाईल असे लेखी पत्र महापालिकेने नायक आणि वेळासकर यांना दिले होते. मात्र महापालिका केवळ पत्र व्यवहार करुन नागरीकांची बोळवण करीत आहे.

    डोंबिवली दत्तनगर आयरे परिसरात क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. या योजनेकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण केले जात आहे. काही भूमाफियांमुळे हे सर्वेक्षण बंद पाडले जात आहे. त्यामुळे गरीबांना क्लस्टर योजनेतून हक्काचे घर मिळणार की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करीत नागरीकांनी स्वत:च्या तोंडाला काळे फासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला.

    महापालिका प्रशासनाच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे सहभागी झाले होते. धोकादायक इमारतीतील नागरीक जीव मुठित धरुन वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. महापालिकेने ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी सगळ्यात प्रथम कल्याणमधील कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात ही योजना प्रथम राबविली जाणार आहे. त्याकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर करुन हे काम एका एजेन्सीला दिले आहे. या एजेन्सीकडून काम सुरु करण्यात आले. डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम भूमाफियांकडून बंद पाडले जाते. सर्वेक्षण सुुरु करण्याची मागणी अनेकवेळा करुन देखील बंद पडलेले सर्वेक्षण सुरु झालेले नाही.

    सर्वेक्षण पोलीस संरक्षणात केले जाईल असे लेखी पत्र महापालिकेने नायक आणि वेळासकर यांना दिले होते. मात्र महापालिका केवळ पत्र व्यवहार करुन नागरीकांची बोळवण करीत आहे. शासन तुमच्या दारी डोंबिवलीत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्याच्या हस्ते हा प्रश्न सोडवू असे म्हटले होते. प्रत्यक्षा नागरीकांनी सरकारच्या दारी खेटे मारावे लागतात. यावरुन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ही नागरीकांनीची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप नायक यांनी केला आहे.