वरुड येथे २ लाख रुपयांचा गांजा जप्त

नूतन तहसीलदार मानेंच्या उपस्थितीत मोठी कारवाई

    वडूज : खटाव तालुक्यातील वरुड येथिल एका ओढ्याच्या कडेला एक जण गांजा ची झाडे लावून विक्री करत असल्याची माहिती धोंडीराम एस.वाळवेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी औंध पोलीस स्टेशन यांना मिळाली असता पोलिस टीमने वरुड येथे छापा टाकला. येथील साळुंखे वस्ती मधील ईश्वर दत्तात्रय जगदाळे हा त्याचे गुरांचे गोठ्यालगत ओढयाचे कडेला गांजाचे झाडे लावुन आणि त्याची विक्री करीत असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळालेने त्यांनी आपले सोबत औंध येथील सहकर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन सरकारी पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक यांना सोबत घेवुन वरुड ता खटाव जि सातारा येथील साळुंखे वस्ती मधील ईश्वर दत्तात्रय जगदाळे यांचे गुरांचे गोठ्याजवळ छापा मारुन सुमारे २,०४,५००/- रुपये किमतीचा गांजा त्यात लागवड केलेली गांजाची झाडे असा मुद्देमाल जप्त केलेला असुन औंध पोलीस स्टेशनला गुरनं २८९/२०२३ गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८,२० (अ) (ब) (२), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरची कारवाई वेळी खटाव तालुक्याच्या तहसीलदार पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या दबंग तहसीलदार श्रीमती.बि.एस‌. माने यांच्या उपस्थितीत झालेली अवैध धंद्यावरील पहिलीच मोठ्ठी कारवाई झाली. शिवाय पोलीसांनी वेषांतर करुन गुरांची माहिती विचारत सदर आरोपींचे गुरांचे गोठयाजवळील बारकाईने पाहणी करुन सदरच्या गांजाची झाडे शोधुन यशस्वी कारवाई केलेली आहे.

    औंध पोलीस स्टेशनने आतापर्यंतची सर्वात मोठया रकमेची गांजाची कारवाई केलेने औंध परिसरातील नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे. या कारवाईमुळे औंध परिसरातील अवैद्य धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसणार असुन गांजामुळे तरुण पिढी व्यसनाधिनते पासून परावृत्त होणार आहे.

    सदरची कारवाई ही समीर शेख,पोलीस अधीक्षक, सातारा, आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे सुचनेप्रमाणे व अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडुज यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम एस. वाळवेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक व गंगाप्रसाद केंद्रे पोलीस उपनिरीक्षक, सहा. फौज.पी.एस.पाटोळे, पो.हवा. डी वाय देवकुळे, पो.हवा.आर.एस. बनसोडे, पो.कॉ.पंकज डी. भुजबळ, पो.कॉ.एम.आर.जाधव, पो.कॉ. एस.एम.झारी, पो.कॉ.एम.व्ही.कदम, पो.कॉं.एम. के.फडतरे, म.पो.कॉ.एन.पी. भुजबळ यांनी केली आहे.