‘यांच्या’ नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेची एक लाख टक्के होणार युती; नवीन लोकांना जोडणे हाच भाजपचा अजेंडा – चंद्रशेखर बावनकुळे

भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप एक लाख टक्के युती होणार आहे. असे प्रतिपादन, आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी धुळयात संवाद कार्यक्रमात केले.

  धुळे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Indian Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या (Central Government) ८ वर्षाच्या योजना (Schemes) जनतेपर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. भारत देशाला जगात ठराविक उंची पर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. पक्षात नवीन लोकांना जोडून घेणे, हा भाजपचा मुख्य अजेंडा असणार आहे. भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप एक लाख टक्के युती होणार आहे (In future shivsena and bjp will be a one hundred thousand percent alliance under the leadership of two leaders says chandrashekhar bawankule). असे प्रतिपादन, आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळयात संवाद कार्यक्रमात केले.

  आज सकाळी स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. १२ ऑगस्ट २०२२ ला मला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने दिली. तेव्हापासून मी जनतेचे प्रश्‍न घेऊन राज्यभर फिरतो आहे. आतापर्यंत १३ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी गेलो.

  तेथे नव्याने संघटना सक्षम करणे, नाविन्यपूर्ण काम करणे, पक्ष प्रवेश करणे यासाठी प्रयत्नशील आहे. धुळे जिल्ह्यात जनप्रतिनिधी चांगले काम करीत आहेत. त्याचे निश्‍चितच समाधान आहे. आजचा दौरा संघटनात्मक आहे, याला कुठलाही राजकीय वास नाही.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम करणे, तसेच भाजपला नंबर एकचा पक्ष करणे हा आमचा उद्देश आहे. शिंदे-फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे काम करीत आहे, आणि भविष्यातही करतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला या दौऱ्याच्या निमित्ताने भेटता यावे. यासाठी आपण दौऱ्याची संकल्पना राबवित आहोत.

  इच्छुकांसाठी भाजपचा दुपट्टा नेहमीच तयार

  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफुस आहे. वेळोवेळी ती समोर येत आहे तसेच अजित पवार यांच्‍या नाराजी नाट्यानंतर जर कोणी भाजपमध्ये येऊ इच्छुक असेल तर भाजपचा दुपट्टा नेहमीच तयार असतो. याबाबत कुठल्याही प्रकारची अट घातली जाणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

  ठाकरेंवर साधला निशाणा

  याकुब मेमन यांच्या कबर सौंदर्यीकरण यावर बोलत असताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील केला. प्रत्येक मोठ्या घटनेची माहिती गृह विभागाला दिली जात असते. मग एवढ्या मोठ्या प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना मिळाली नव्हती का? असा प्रश्न यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित केला.

  कार्यक्रमाला खा. डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री अमरिश पटेल, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी सभापती शितल नवले, उपमहापौर अनिल नागमोते, जि.प. सदस्य राम भदाणे, आशुतोष पाटील, नगरसेवक हिरामण गवळी आदी उपस्थित होते.