बाजार समिती आक्रमक; डमी आडत्यांप्रकरणी 3 संचालकांसह 15 जणांना दंड

शेतकर्‍याला डमी आडत्याने मारहाण केल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने आक्रमक भूमिका घेत मंगळवारपासून बेकायदा डमी अडत्यांवर कारवाई सुरु केली असून, दाेन संचालकांसह पंधरा जणांकडून दंड वसूल केला आहे.

  पुणे : शेतकर्‍याला डमी आडत्याने मारहाण केल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने आक्रमक भूमिका घेत मंगळवारपासून बेकायदा डमी अडत्यांवर कारवाई सुरु केली असून, दाेन संचालकांसह पंधरा जणांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई केवळ दंडात्मक स्वरुपाचीच राहणार की परवाना रद्द केला जाणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
  रविवारी डमी आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण झाली हाेती. या प्रकारानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सभापती दिलीप काळभाेर यांनी नियमापेक्षा जास्त डमी आडते आणि गाळ्यासमाेर पंधरा फुटापेक्षा जास्त जागेचा वापर करण्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले हाेते. त्यानुसार मंगळवारपासून समितीच्या प्रशासनाने कारवाई सुरु केली.
  बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून  प्रत्येकी 5 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांच्यासह नऊ जणांवर प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली हाेती. बुधवारी देखील प्रशासनाने कारवाई सुरु ठेवली. सहा आडत्यांवर दंडात्मक कारवाई करून, त्यांच्याकडून एकुण पाच हजार ९०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
  संख्या कमी करण्याकडे दुर्लक्ष
  बाजार आवारातील डमी आडते हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. आडतदाराला शेतमालाच्या विक्रीसाठी मदतनीस म्हणून डमी आडते ठेवण्यास परवानगी देण्यात आली. परंतु या डमी आडत्यांची संख्या वाढतच गेली आहे. यापूर्वी प्रशासनाने डमी आडत्यांच्या संख्येवर बंधन घातले हाेते. केवळ दाेनच डमी आडते ठेवता येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले हाेते. त्यानंतरही आडत्यांकडून डमीची संख्या कमी केली गेली नाही.
  डमी आडत्यांमुळे हाेते नुकसान
  आडतदाराकडे येणारा शेतमाल हा संबंधित डमी आडतदार खरेदी करताे, त्यानंतर ताे शेतमाल हा किरकाेळ वि्ाक्रेत्याला डमी आडतदार विकताे. यामुळे शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत डमी आडत्याच्या रुपाने आणखी एक मध्यस्थ तयार झाला आहे. या डमी आडतदारामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतमालाचा रास्त भाव मिळत नाही, तुलनेत ग्राहकालाही रास्त भावात ताे मिळत नाही. यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान हाेत आहे.