
पुणे : पगाराबाबत खोटी माहिती देऊन तसेच दारू, तंबाखूचे व्यसन असतानाही ते नसल्याची माहिती देऊन तरुणीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समजल्यानंतर पत्नीने थेट पोलिसांकडे पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता पतीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात सागर दयाल मारवाह असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
पगाराबाबत दिली खोटी माहिती
याबाबत ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर व तक्रारदार यांचा २०१५ मध्ये विवाह झाला आहे. विवाह करण्यापूर्वी मात्र सागर याने त्याच्या पगाराबाबत खोटी माहिती दिली. तसेच, स्वतःला तंबाखू, दारू आणि इतर मुलींसोबत संबंध नाहीत, अशी खोटी माहिती देत त्याबाबत माहिती लपवली.
जवळपास २० लाख रुपयांची फसवणूक
त्याने खोटे बोलून त्यांच्याशी विवाह केला. त्यासोबतच त्यांना वेळोवेळी शिवीगाळ आणि मारहाण करीत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्याने तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींची जवळपास २० लाख रुपयांची फसवणूकही केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून हे पैसे घेतले होते. तक्रारदार व त्यांच्या मैत्रिणीत असलेल्या एका फ्लॅटची सेलडीड अॅग्रीमेंट व पावर ऑफ अॅटर्नी स्वतःकडे ठेवली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सुरू आहे.