गोळीबार करणाऱ्या सातपुते टोळीवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्तांची आतापर्यंत 42 गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते (Omkar Satpute) आणि त्याच्या साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांची ही 42 वी मोक्का कारवाई आहे.

  पुणे : पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते (Omkar Satpute) आणि त्याच्या साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांची ही 42 वी मोक्का कारवाई आहे.

  ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते (वय 23), वीर फकीरा युवराज कांबळे (वय 22, दोघेही रा. शिवणे, वारजे माळवाडी) तसेच त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ओंकार सातपुते याला अटक केली आहे. तर, वीर कांबळे हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांकडे देण्यात आले आहे.

  अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

  वारजे पोलिसांनी तपास करत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे व नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यावेळी हा गुन्हा पूर्ववैमनस्यासातून ओंकार उर्फ टेड्या सातपुते व वीर कांबळे यांच्या सांगण्यावरुन पूर्वनियोजित कट रचून केला असल्याचे समजले. या दोघांनी गुन्हा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात कलम वाढ केली. टेड्या सातपुतेने संघटीत टोळी तयार करुन खूनाचा प्रयत्न, दरोडा, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी तसेच पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे असे गुन्हे वारंवार केल्याचे समोर आले.

  मोक्का कारवाईचा प्रस्ताव

  या गुन्ह्यात मोक्काचे कलम वाढवून मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांनी वरिष्ठांच्यामार्फत पाठविला. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाई केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे, पोलीस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कातुर्डे यांच्या पथकाने केली.

  माळवाडी पोलिसांत गुन्हा

  रामनगर येथील जय भवानी चौकात यातील तक्रारदार तरुण मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तेव्हा त्यांना बोलावून घेत शिवीगाळ करुन ‘आज तुला खल्लासच करतो’ असे म्हणत त्यांच्यावर बंदूक रोखली आणि गोळीही झाडली. पण, तक्रारदार तरुणाने बंदूक हाताने वळवल्याने गोळी जमीनवर लागली आणि अनर्थ टळला. परंतु, दुसन्यांदा गोळीबार केल्याने गोळी तरुणाच्या कमरेला लागली व तो गंभीर जखमी झाला.