अडचणीच्या व्यवस्थेमुळे आमदाराने नाकारले भोजन; पीआरसी कमिटीच्या पावित्र्याने ‘झेडपी’ प्रशासनाची दाणादाण

सोलापूर जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी पंचायतराज समिती बुधवारी सोलापुरात दाखल झाली आहे. पंचायतराज समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली

    सोलापूर : जिल्हा परिषद प्रशासनाने अडचणीच्या ठिकाणी केलेली भोजन व्यवस्था पीआरसी कमिटीच्या सदस्याने नाकारल्यामुळे अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी पंचायतराज समिती बुधवारी सोलापुरात दाखल झाली आहे. पंचायतराज समितीचे अध्यक्ष रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. सकाळच्या सत्रात स्वागत, परिचय, यानंतर आढाव्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी भोजनाची सुट्टी घेण्यात आली.

    जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व सदस्यांची ऑफिसर्स क्लब येथे भोजनाची व्यवस्था केली आहे. बैठकीनंतर सदस्य भोजनस्थळी पोहोचले. पण तेथील व्यवस्था पाहून एका आमदाराने भोजन नाकारले. ‘मी माझ्या स्वतःच्या खर्चाने इतर ठिकाणी भोजन घेईन’, असे म्हणून ते तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. पीआरसी कमिटीच्या सदस्यांच्या या पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांची दाणादाण उडून गेल्याचे चित्र दिसून आले.

    अशा व्यवस्थेबद्दल आश्चर्य

    सोलापुरात फाईव्ह व थ्री स्टार हॉटेल आहेत. पण कमिटीचा दौरा ऐनवेळी रद्द होतोय की काय या भीतीने प्रशासनाने फाईव्हस्टार हॉटेलमध्ये बुकिंग केलेच नव्हते. त्यामुळे ऐनवेळी त्यांना या हॉटेलची सेवा मिळालीच नाही. त्यामुळे इतर हॉटेलमध्ये सदस्यांची व्यवस्था लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषद प्रशासनाने अशी अडचणीची व्यवस्था केल्याबद्दल सदस्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.