
दौंड (Dound) तालुक्यातील पश्चिमेकडील डाळिंब (Dalimb) परीसरात गेल्या कित्येक महिन्यापासून बेसुमार आणि अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र अर्थपूर्ण संबंदीमुळे याकडे जाणीव पूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा सुरु आहे.
दौंड : दौंड (Dound) तालुक्यातील पश्चिमेकडील डाळिंब (Dalimb) परीसरात गेल्या कित्येक महिन्यापासून बेसुमार आणि अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र अर्थपूर्ण संबंदीमुळे याकडे जाणीव पूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा सुरु आहे.
डाळिंब येथील दक्षिणेस ढवलेशवंत डोंगराच्या पायथ्याला गेल्या कित्येक महिन्या पासून बेकायदेशीर उत्तखनन केलेल्या वाळूचे मोठं मोठे अनेक साठे आहेत. चार वर्षापासून वाळू उपशातून लक्षाधीश झालेल्या वाळू माफियांनी डाळिंब आणि परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे या वाळू माफियां विरोधात बोलण्याचे धाडस कोणी करीत नाही.
ओढे, तलाव वाळू तस्करीची ठिकाणे
डोंगरापासून सुरू होणार लहान मोठे ओहोळ, नाले, ओढे, तलाव आदी ठिकाणे वाळू तस्करीची ठिकाणे बनली आहेत. सध्या बाजारात सहजा सहजी वाळू मिळत नाही. यामुळे वाळूला मोठा दर मिळत आहे. किमान ८ ते १० हजार रुपये ब्रास वाळूचा दर आहे. रोज किमान चार ब्रास वाळू ४० हजारास विकली जाते. यामधून ७ ते ८ हजार खर्च जाता ३० ते ३२ हजार दैनंदिन उत्पन्न मिळविले जाते. डाळिंब येथे पाच ते सहाजण उन्मत झालेले वाळू तस्कर हा अवैध वाळू उपसा करीत आहेत.
वाळू माफियांवर कायदेशीर कारवाई करा
बेसुमार वाळू उपशामुळे ओढे, नाले आणि तलाव विद्रूप करण्यात येत असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. डाळिंब येथील गट नंबर ३७० आणि ३७४ मध्ये मोठं मोठे वाळू साठे आहेत. येथील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करण्यात यावा. तसेच वाळू माफियांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
अधिकाऱ्यांच्या रंगीत संगीत पार्ट्या
स्थानिक पोलीस, तलाठी आणि तस्कर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याच संबंधातून डाळिंबामध्ये अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. या माधमातून मोठी माया या सर्वांनी जमा केली आहे. हे सर्व येथील एका रिसॉर्टमध्ये रंगीत संगीत पार्ट्या करीत असतात, अशी जोरदार चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे.