पुरंदरच्या ३६ गावांत पाणीपातळी वाढीसाठी उपाययोजना सुरु; ‘अटल भूजल’अंतर्गत कलापथकाद्वारे जनजागृती

पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळ पडत असून तालुक्यातील बहुतेक गावांतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. पाणीपातळीत वाढ होवून योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत तालुक्यामधील ३६ गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे.

  सासवड : पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्षे दुष्काळ पडत असून तालुक्यातील बहुतेक गावांतील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. पाणीपातळीत वाढ होवून योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत तालुक्यामधील ३६ गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात येऊन विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कलापथकाची निर्मिती केली असून, कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

  पुरंदरमधील माळशिरस, हिवरे व दिवे ग्रामपंचायतमध्ये जय मल्हार कला मंच या कला पथकामार्फत २५ ते २७ जुलै या कालावधीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. या गावांमध्ये भूजल पातळी कमी झाल्यामुळे या गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात येऊन विविध उपाययोजना घेण्यात आल्या.

  गीतांच्या माध्यमातून प्रबोधन

  मल्हार कला मंच या कलापथकामार्फत मनोरंजन आणि वेगवेगळया गीतांच्या माध्यमातून लोकसहभागीय अटल भुजल योजनेविषयी, भूजल बचतीचे महत्व, पाण्याचे महत्व, विहीर पुर्णभरण, ठिबक व तुषार सिंचन, भुजल पातळीमध्ये घसरण दरामध्ये सुधारणा करणे, ग्राम पंचायतीच्या जलसुरक्षा आराखड्यातील विविध विभागाच्या योजनांच्या अभिसरणातून होणारी जलसंधारणाची विविध कामे व जलसुरक्षा आराखडयाची प्रभावी अंमलबजावणी तसेच भूजल पातळी इत्यादी बाबत जनजागृती करण्यात आली.

  ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  वरिष्ठ भू वैज्ञानिक संतोष गावडे व सहाय्यक भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या शुभांगी काळे, दर्शन साठे व राकेश देशमुख यांच्या सहकार्यातून पथनाट्याद्वारे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिना भूजल पातळीबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले.