वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी उदध्वस्त; दौंड व कर्जत महसूल पथकाची  कारवाई    

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नायगाव हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात अहोरात्र वाळू उपसा करणाऱ्या दोन फायबर, एक शेक्शन बोटी महसूल पथकाने जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट करून नदीपात्रात बुडवून वाळू चोरांवर  गुन्हे दाखल केले.

    दौंड : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नायगाव हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात अहोरात्र वाळू उपसा करणाऱ्या दोन फायबर, एक शेक्शन बोटी महसूल पथकाने जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट करून नदीपात्रात बुडवून वाळू चोरांवर  गुन्हे दाखल केले.

    वाळू तस्करांचे २५ लाख रुपयांचे नुकसान

    यामध्ये अंकुश ठोबरे (रा. गणेशवाडी), भरत आमणार, (रा. मलठण) यांच्यावर गाव कामगार तलाठी नंदकुमार खरात यांनी फिर्याद दाखल करून गुन्हे दाखल केले आहेत. गेली अनेक दिवसांपासून या भागात चोरून वाळू उपसा केला जात होता, मात्र यांच्यावर कारवाई झालीच नाही. या कारवाईत तस्करांचे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या कारवाईचा वाळू तस्करांनी चांगला धसका घेतला आहे.

    भीमा नदीपात्रात गेली अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटी दररोज नदीपात्रातील शेकडो ब्रास वाळूचा उपसा करत असताना या भागातून कारवाई व्हावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. महसूल पथकाने कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून पाण्यात बुडवल्या आहेत.

    या कारवाईसाठी दौंड तहसीलदार संजय पाटील, कर्जतचे तहसीलदर नानासाहेब आगळे, मंडल अधिकारी मंगेश नेवसे, संतोष जाधव ,नितीन मकत्तेदार,गावकामगार तलाठी संतोष इडोळे, सचिन जगताप, दीपक आजबे, नंदकुमार खरात यांनी नदीपात्रात येऊन आक्रमक भूमिका घेत हा कारवाईचा बडगा उगारला आहे.