नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी राज ठाकरे यांच्या भेटीला 

पालकमंत्री देखील शेतकऱ्यांना फसवत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे नैना विरोधात रोष वाढत आहे. दरम्यान नैना प्रकल्प ग्रस्त शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

    पनवेल, ग्रामीण : नैना विरोधात लढ्यामध्ये आणखी ताकद मिळावी या उद्देशाने नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची आज भेट घेण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले.
    नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. कित्येक मोर्चे, आंदोलने, उपोषण करून देखील नैनाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आगामी काळात नैना विरोधात शेतकरी तीव्र लढा देण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री देखील शेतकऱ्यांना फसवत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे नैना विरोधात रोष वाढत आहे. दरम्यान नैना प्रकल्प ग्रस्त शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नैना शेतकऱ्यांना का नको आहे ही भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली. राज ठाकरे यांच्या इतर नियोजित दौऱ्यांमुळे त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन दर्शवताना, मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घडवून दिली. लवकरच आमदार राजू पाटील हे नैना प्राधिकरण रद्द व्हावं या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सहसचिव शेखर शेळके, सरपंच डीबी म्हात्रे ,माजी सरपंच बबन पाटील, माजी उपसरपंच विजय शेळके, नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती खजिनदार बाळाराम फडके हे उपस्थित होते. या भेटीसाठी मनसेचे केसरीनाथ पाटील, योगेश चिले आणि अदिती सोनार यांनी सहकार्य केले.