संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

ग्रामपंचायतीच्या विविध विषयांच्या कामानिमित्त तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती बांधकाम विभाग, कृषी विभाग,लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग, एसटी डेपो यासह अनेक प्रशासकीय कार्यालयामध्ये गावपातळीवरील कामे करताना अडचणी येत आहेत.

    वडूज : खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणे तसेच संघटनेच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणण्यासाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा मेळावा वडूज (ता.खटाव) येथील पंचायत समितीमध्ये सोमवारी (दि.20) सकाळी 10.30 वाजता आयोजित केल्याची माहिती खटाव तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

    याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या विविध विषयांच्या कामानिमित्त तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती बांधकाम विभाग, कृषी विभाग, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग, एसटी डेपो यासह अनेक प्रशासकीय कार्यालयामध्ये गावपातळीवरील कामे करताना अडचणी येत आहेत. तर काहींकडून अडचणी आणल्या जात आहेत. यावर चर्चा करून मार्ग काढण्याबरोबरच सध्या गावोगावी असणारा स्ट्रीट लाईटचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांच्यावर तातडीने मार्ग काढण्याबरोबरच पंचयात समितीमध्ये कामकाजानिमित्ताने येणाऱ्या महिला सरपंच व पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी, थांबण्याची कोणतीच सुविधा नाही.

    यासह चर्चा करण्यात येणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले असून, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी आपआपल्या गावच्या अडचणी व प्रश्न घेऊन उपस्थित राहण्याचे आव्हान तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेने केले आहे.