वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत लवकरच बैठक

- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आश्वासन; वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हस्ते कामगार मंत्र्यांचा सत्कार

    सांगली : वृत्तपत्र विक्रेत्या कल्याणकारी मंडळासाठी (Newspaper Vendors Welfare Board )यापूर्वी झालेल्या कामाची माहिती घेऊन लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Dr Suresh Khade)यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एेजंट असोसिएशनच्या वतीने कामगार मंत्री पदी निवड झाल्याबद्दल डॉ. खाडे यांचा सत्कार राज्य सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे राज्य नेते मारुती नवलाई जिल्हा संघटक प्रशांत जगताप उपस्थित होते.

    डाॅ. खाडे यांना यावेळी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना ही राज्यातील तीन लाख वृत्तपत्र विक्रेत्यांचे नेतृत्व करणारी, त्याच्या प्रश्नांसाठी झगडणारी एकमेव शिखर संघटना आहे. मागील बारा वर्षाहून अधिक काळ राज्यसंघटना वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता कल्याणकारी मंडळ व्हावे म्हणून प्रयत्नशिल आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०१९ मध्ये भाजपा आमदार संजय केळकर (ठाणे) यांच्या प्रयत्नाने व तत्कालीन कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे शासकीय आदेशाने वृत्तपत्र विक्रेत्यांकरीता अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचा अहवाल दि. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यसरकारकडे देण्यात आलेला आहे.

    कोरोना माहामारी व इतर कारणाने त्या अहवालाचे रुपांतर कल्याणकारी मंडळांत झालेले नाही. तरी आपणास विनंती आहे की, हा अहवाल कार्यान्वीत करुन कल्याणकारी मंडळांत रुपांतर करावे याबाबत कामगार मंत्री म्हणून आपण तातडीने आपल्या अध्यक्षतेखाली, आमदार संजय केळकर ठाणे संबधित सर्व अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करावे. याबाबत आमदार केळकर यांच्याशी चर्चा करु, माहिती घेऊन लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन डाॅ. खाडे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिले. यावेळी विशाल रासनकर, सचिन माळी, श्रीपाद उर्फ पिंटू पाटील, राजेंद्र पोटे, दादासो गुरव, निलेश कोष्टी, पोपट मंडले, सुरेश घोडके, विनायक तांबोळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.