नाशिकच्या आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा; भुसे-भुजबळ यांच्यात अर्धा तास संवाद झाल्याची माहिती

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.

    नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी भुजबळ व भुसे यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

    भुसे पालकमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांनी भुजबळांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि महानगरप्रमुख बंटी तिदमे हे देखील उपस्थित होते. पालकमंत्री दादा भुसे भुजबळ फार्म येथे दाखल होताच माजी खासदार आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, समता परिषदेचे दिलीप खैरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे हे देखील दादा भुसे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले.

    भुसे पालकमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच भुजबळांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोघांमध्ये भुजबळ फार्म येथील कार्यालयात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पालकमंत्री बदलाबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.

    यावेळी नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात भुजबळांचे नाव अग्रस्थानी होते. या चर्चेला विराम मिळताच दादा भुसे हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. नाशिकमध्ये होणाऱ्या महाशिवपुराण कथेसंदर्भात चर्चा झाल्याचे यावेळी दादा भुसे यांनी सांगितले.