जिल्हा परिषदेत मेगा भरती ; ७७० जागा रिक्त, शासनाने माहिती मागविली 

६१६ जागा भरण्याची शक्यता

    सांगली : राज्यात सत्तांत्तर झाल्यानंतर सरकारने 75 हजार जागांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून शासनाने ऑक्टोंबर 2022 मधील रिक्त जागांची माहिती मागवली आहे. सांगली जिल्हा परिषदेत तब्बल 770 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यात येणार असल्याने 616 पदे भरण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची पूर्वीप्रमाणे जिल्हा निवड मंडळातर्फे भरली जाणार असून एप्रिल 2023 मध्ये लेखी परीक्षा होईल.

    मागील काही वर्षापासून जिल्हा परिषदेतील रिक्त जागांचा प्रश्न भेडसावत आहे. विविध संवर्गाची अनेक पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय व विकास कामांसाठी अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने संबंधितांचा पदभार प्रभारीकडे देण्यात आला आहे. वरिष्ट अधिकार्‍यांच्या जागेवर कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत शासनाकडून गट क वर्गातील 2 हजार 69 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1 हजार 299 कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित 770 कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. सामान्य प्रशासन, वित्त विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, बांधकाम, छोटे पाटबंधारे, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण, आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील रिक्त जागांचा समावेश आहे.

    आरोग्य विभागातील सर्वाधिक 567 जागा रिक्त असून त्यापैकी 453 जागा भरण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञव आरोग्य पर्यवेक्षक पदांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागात 39 पदे, वित्त विभाग 7, ग्रामपंचायत विभागातील कंत्राटी ग्रामसेवक व विस्तार अधिकारी 73, बांधकाम विभागातील कनिष्ट अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ट आरेखक मिळून 29, कृषी विभाग 1, छोटे पाटबंधारे विभागातील 10, पशुसंवर्धन विभाग 28, महिला बालकल्याण 9 आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील 7 पदे रिक्त आहेत. या सर्व रिक्त जागांपैकी 80 टक्केप्रमाणे 616 जागा भरण्यास परवानगी मिळू शकते.