माथेफिरूने भर रस्त्यात बस अडवून केला बस चालकावर कोयत्याने हल्ला, बसच्या काचा फोडल्या

मोठ्या धाडसाने बस चालक आणि कंडक्टरने या माथेफिरूला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिलं.

    कल्याण : भर रस्त्यात एका माथेफिरूने मानसिक तणावामध्ये बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बस चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने कोयत्याने बसची तोड फोड केली. इतकेच नव्हे आणखी दोन बसची तोड फोड केली आहे. कल्याण रामबाग परिसरात सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्या धाडसाने बस चालक आणि कंडक्टरने या माथेफिरूला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिलं. बाळू साबळे असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    गुरुवारी रात्री सायंकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिम राम बाग परिसरात एका माथेफिरूने हातात कोयता घेत चांगलाच धिंगाणा घातला केडीएमटीची बस अडवून बस चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रतिकार केल्याने या माथेफिरूने बसवर कोयत्याने प्रहार करत बसेसच्या काचा फोडल्या. यानंतर पाठीमागून येणाऱ्या दोन बसेसच्या काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली. बस चालक व कंडक्टरने मोठ्या धाडसाने या माथेफिरूला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

    घटनेच्या माहितीनंतर महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या माथेफिरूला ताब्यात घेतलं. बाळू साबळे असे या माथेफिरूचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महात्मा फुले पोलिसांनी बाळू साबळे याला ताब्यात घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.