यशस्वी उद्योजिका होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन

प्रत्येक महिलेत यशस्वी उद्योजिका होण्यासाठी आवश्यक सुप्तगुण असतात. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतात असे मत अभिती वेलफेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा तपस्वी यांनी व्यक्त केले.

    पुणे : प्रत्येक महिलेत यशस्वी उद्योजिका होण्यासाठी आवश्यक सुप्तगुण असतात. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतात असे मत अभिती वेलफेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा तपस्वी यांनी व्यक्त केले.

    डॉ. तपस्वी यांनी शासनांतर्गत महिला उद्योजिकता विकासासाठी सक्षम धोरण राबविले असून त्या महिला बाल विकास मंत्रालयात मुख्य सल्लागारपदी नियुक्त आहेत. गेली २२ वर्षे मेरी सहेली संस्था महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. याच संस्थेद्वारे संस्थापिका देवी तन्ना यांनी महिला उद्योजिकांसाठी बरकत हे व्यासपीठ उपलब्ध केले असून या व्यासपीठातर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात डॉ. तपस्वी बोलत होत्या.

    त्या म्हणाल्या, महिला उद्योजकांसाठी शासनाकडे अनेक योजना उपलब्ध आहेत त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे तसेच या योजना संदर्भात महिलांमध्ये जागरूकता असणे आवश्यक आहे. माध्यम आणि विपणन यासंदर्भात केपी’ज टोटल मिडिया सोल्युशन्सच्या करुणा पाटील यांनी उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले.

    त्या म्हणाल्या, राज्याच्या आर्थिक विकासात महिला उद्योजकता महत्त्वाचा घटक आहे. महिलांना त्यांच्यातील उद्योजकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी काळानुरूप बदलणं तसच स्वतःला अपडेटेड ठेवणं आवश्यक आहे. आधुनिक संवाद साधने, दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय यामुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. इ-कॉमर्स सारखे व्यवसायाचे पर्याय जे आपण एकाच ठिकाणी कार्य करत असताना देशभर ग्राहकांना सेवा देऊ शकतो या साठी महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आणि इंटरनेटचा वापर या विषयी जागरूक असणं आवश्यक आहे. सध्याचा जमाना हा डिजिटल असून प्रसार आणि प्रचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत याचा लाभ महिला उद्योजकांनी घ्यायला हवा.

    मेळाव्यास वसुंधरा परीवारच्या अध्यक्षा योगिता गोसावी, डॉ. हर्शिदा चांदविनिया, पूजा श्रीश्रीमाळ, डॉ. मेधा शहा, रचना बंकापुर, ज्योती ठक्कर आदी उपस्थित होते.