फ्लेमिंगो संवर्धनासाठी जाळीचे कुंपण, नवी मुंबई पालिकेने केली व्यवस्था, डीपीएस पाणथळ जागेत उभारले कुंपण

  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) हजारो संख्येने फ्लेमिंगोंचे आगमन होत असलेल्या डीपीएस तळ्यावर संरक्षक कुंपण उभारले आहे. पक्षी निरीक्षकांकडून पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणारे अनेकजण ऊत्साहात तळ्याच्या कोरड्या भागात अवैधपणे शिरतात दगडफेक करुन पक्ष्यांना त्रास देतात.तसेच काही लोक पक्ष्यांना उडायला भाग पाडून त्यांच्या पार्श्वभूमीवर आपली सेल्फी घेतात, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक, पर्यावरणवादी बी. एन कुमार यांनी सांगितले.

  तळ्यावर आरामदायकपणे राहणा-या पक्ष्यांच्या नको एवढे जवळ जाऊन लोक दलदलीमध्ये अडकु शकतात असा धोक्याचा इशारा देखील कुमार यांनी वारंवार प्रशासनाला इशारा दिला होता.ही बाब नवी मुंबई मनपाच्या लक्षात आणून दिल्यावर, तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी क्षेत्राभोवती तात्काळ कुंपण घालण्याचे आणि सतर्कतेचे साइन बोर्ड लावण्याचे आदेश दिले होते. सतर्कतेच्या इशा-यांकडे दुर्लक्ष करुन लोक तळ्याच्या क्षेत्राच्या अवतीभवती अजूनही फिरताना आढळत आहेत.कुमार आणि सहकारी पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी ही समस्या विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेल्यानंतर, नार्वेकरांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. अखेर नागरिकांनी पाणथळ जागेत उतरू नये यासाठी पालिकेने जाळीचे कुंपण उभारले आहे.आता कुंपण बांधण्याचे हे काम पूर्ण झाल्यावर, हे क्षेत्र माणसे तसेच पक्ष्यांसाठी देखील सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे असे म्हणत कुमार यांनी नवी मुंबई मनपाने पाणथळ क्षेत्रावर बांधलेल्या वॉचटॉवर्सकडे पक्ष्यांच्या चाहत्यांचे लक्ष वळवले आहे.

  कोट –
  गेल्या महिन्यामध्ये ११.९६ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी निविदा जाहिर केल्या आहेत आणि नुकतेच काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्य शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

  फ्लेमिंगो सिटी नाव
  चौकट : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी नाव देत वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानुसार शहरात उपक्रम राबवली होते.त्याचा परिणाम म्हणून इथे भेट देणा-या लोकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली.