संदेश पत्रांमुळे तळेरे गावाला मिळाला सांस्कृतिक चेहरा

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पावसकर यांचा गौरव समारंभ तळेरे येथील 'अक्षरघर' येथे आयोजित करण्यात आला. यावेळी कवी कांडर यांच्या हस्ते पावसकर यांचा शाल, स्मृतीचिन्ह, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.

  • पत्रसंग्राहक निकेत पावसकर गौरव सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
  • पावसकर यांच्या प्रकट मुलाखतीलाही प्रतिसाद

सिंधुदुर्ग-तळेरे : एखाद्या गावाला (Village) सांस्कृतिक चेहरा (Cultural Inentity) प्राप्त होण्यासाठी त्या गावातील सांस्कृतिक कार्यकर्त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं. तळेरे गावाला (Talere Village) संदेश पत्रसंग्राहक (Message Collector) म्हणून महाराष्ट्रात (Maharashtra) ख्याती मिळविलेल्या निकेत पावसकर (Niket Pavaskar) यांच्यामुळे तळेरे गावाला स्वतंत्र सांस्कृतिक चेहरा प्राप्त झाला. अशा गावच्या गुणी कलावंताला गावानेही जपायला हवे. तळेरे गाव पावसकर यांच्यासारख्या गुणी कलावंतावर प्रेम करून याचीही प्रचिती देत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर (Poet Ajay Kandar) यांनी येथे केले.

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पावसकर यांचा गौरव समारंभ तळेरे येथील ‘अक्षरघर’ येथे आयोजित करण्यात आला. यावेळी कवी कांडर यांच्या हस्ते पावसकर यांचा शाल, स्मृतीचिन्ह, ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. साहित्य-समाज चळवळीतील कार्यकर्ते ॲड. विलास परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कवी राजेश कदम, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर आदी उपस्थित होते.

ॲड. विलास परब म्हणाले, निकेत पावसकर हे कलावंत म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढे ते माणूस म्हणूनही मोठे आहेत. म्हणून त्यांचा हा गौरव येथे आयोजित केला गेला आहे. असं प्रेम दुर्मिळ कलावंतांना मिळतं. त्यांच्या पत्रसंग्रहामध्ये महाराष्ट्राबरोबर देश, विदेशातील साहित्यिक -संगीत -नाटक -क्रीडा अशा विविध क्षेत्रातील जगप्रसिद्ध व्यक्तींची संदेश पत्रे आहेत. यावरून त्यांनी या संदेश पत्रांसाठी किती अपार मेहनत घेतली आहे हे लक्षात येते. संदेश पत्रांमुळे देश विदेशातील महनीय व्यक्तींशी पावसकर जोडले गेले. त्यामुळे त्यांच्या तळेरे येथील अक्षरघरालाही जगविख्यात व्यक्तींनी भेट दिली. यावरून त्यांच्या कामाची निष्ठा आपल्या लक्षात येते.

मोरजकर म्हणाले, गेली पंचवीस वर्ष पावसकर यांच्याशी स्नेह आहे. त्यांनी पत्र संग्राहक म्हणून केलेले काम मोठे आहे. पत्रसंग्राहक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली तरी त्यांच्यातील नम्रता सगळ्यांना जोडून ठेवते. या त्यांच्या गुणामुळेच किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांचा हा गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी राजेश कदम यांनी पावसकर यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते म्हणाले, माझ्या कुटुंबाने मला साथ दिल्यामुळे पत्रसंग्राहक म्हणून यश मिळू शकले. काही कडू गोड अनुभवही आलेत. परंतु या प्रवासात खूप जगप्रसिद्ध व्यक्तीने प्रेम दिले. अनेकांशी ऋणानुबंध जोडले गेलेत. हे प्रेम मिळाल्यामुळेच मी हे काम करू शकलो. मात्र आपल्या या पत्र संग्रहामध्ये देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे पत्र नसल्याची खंत कायम मनात राहणार आहे.

या कार्यक्रमाला सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे उपाध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, माइंड ट्रेनर सदाशिव पांचाळ, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, प्रज्ञांगणच्या श्रावणी मदभावे, श्रावणी कम्प्युंटर इन्स्टिट्यूटचे संचालक सतिश मदभावे, पत्रकार गुरुप्रसाद सावंत, उदय दुदवडकर, नाधवडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डि. एस. पाटील, उमेद फाऊंडेशनचे नितीन पाटील, जाकीर शेख आणि सदस्य, प्रतिष्ठित नागरिक अशोक तळेकर यांच्यासह तळेरे येथील विविध संघटनांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते.

विविध संघटनांकडून गौरव

निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र संग्रहाला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उमेद फाऊंडेशनच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ, प्रज्ञांगण परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग मित्र परिवार यांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन पावसकर यांचा गौरव करण्यात आला.