मेट्रोला महावितरणकडून वीजपुरवठा नाही; अंतर्गत यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रोची सेवा ठप्प

वनाझ ते रूबी हॉल मार्गावरील मेट्रो सेवा २० मिनिटे बंद पडली होती. यासाठी महावितरण कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही तसेच पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    पुणे : नव्यानेच सुरू झालेल्या पुणे मेट्रोचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वनाझ ते रूबी हॉल मार्गावरील सेवा २० मिनिटे बंद पडली होती. यासाठी महावितरण कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही तसेच पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    पुणे महामेट्रोला महावितरणकडून नव्हे, तर महापारेषणकडून १३२ केव्ही दाबाचा वीजपुरवठा केला जातो. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पुणे मेट्रोकडून रेंजहिल्स अतिउच्चदाब १३२ केव्ही उपकेंद्रात वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी अंतर्गत वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवेचा वीजपुरवठा २० मिनिटे बंद होता.

    मात्र या प्रकाराशी महावितरण व महापारेषण कंपनीचा कोणताही संबंध नाही. तर मेट्रोच्या अंतर्गत वीज यंत्रणेतील बिघाडामुळे मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प झाली होती.