म्हाडा पुणे मंडळाची सोडत सोमवारी; सोडतीत ५८ हजार अर्जदार सहभागी होणार

म्हाडाच्या पुणे मंडळाची सहा हजार ५८ घरांच्या लांबणीवर पडलेल्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या घरांची सोडत सोमवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असून, या सोडतीत ५८ हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.

पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाची सहा हजार ५८ घरांच्या लांबणीवर पडलेल्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या घरांची सोडत सोमवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असून, या सोडतीत ५८ हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.

पुणे मंडळाच्या सोडतीसाठीची सोडतपूर्व प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होती. त्यानुसार ७ मार्च रोजी सोडत जाहीर होणार होती. मात्र अचानक ही सोडत पुढे ढकलण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत काढण्याचा अट्टाहास पुणे मंडळाचा होता. मात्र सोडतीसाठी फडणवीस यांची वेळ न मिळाल्याने पुणे मंडळाने अचानक सोडतच पुढे ढकलली. यासाठी मंडळाने कोणतेही कारण दिले नाही आणि अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा लांबली. आता अखेर फडणवीस यांची वेळ मिळाली असून मंडळाने सोडतीसाठी सोमवारचा मुहूर्त धरला आहे.

फडवणीस आपल्या दालनातून सोमवारी सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सोडतीला सुरुवात करणार आहेत. ही सोडत पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील गृहनिर्माण भवनात पार पडणार आहे.