…म्हणून पालकमंत्री भरणे यांच्या नावाचा म्हसोबा स्थापन

एका दगडाला शेंदूर लावून चंद्रभागेच्या पवित्र पाणी या दगडावरती घालून पूजा करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.

    पंढरपूर : उजनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज चंद्रभागा नदीपात्रामध्ये भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ उजनी धरणातून बारामती व इंदापूर तालुक्यातील काही गावांना लाकडी लिंबोडी या योजनेला ३४८ कोटी रुपये मंजूर करून सरकारने गेल्यावर्षी सोलापूरकरांचा आंदोलनाचा धसका घेऊन रद्द केलेली योजना पुन्हा कागदाची मोडतोड करून ही योजना पुढे दामटली. म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावाचा म्हसोबा नदीपात्रामध्ये स्थापन करण्यात आला.

    एका दगडाला शेंदूर लावून चंद्रभागेच्या पवित्र पाणी या दगडावरती घालून पूजा करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. या अगोदरही नीरा-देवघर धरणाचे पाणी असेल खडकवासला धरणाचे पाणी असेल. सांगोला पंढरपूर तालुक्यावर अन्याय करून बारामतीकडे वळवण्याचे महापाप यांनीच केलेल आहे. उजनी धरणातून ही बारामती एमआयडीसी सिनार मासप्रकल्प व इतर औद्योगीकरणाला उजनी धरणातून प्रचंड पाणी गेलेले आहे.

    यावेळी माऊली हळणवर म्हणाले की, शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार, दत्तात्रय भरणे या तिघांच्या संगनमताने खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत त्रास होऊ नये म्हणून त्या भागातील लोकांना खूष करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यावर प्रचंड अन्याय करीत जिल्हावाशीयांच्या पाठीत खंजीर खुपसून ही योजना पुढे नेण्याचं काम व हक्काचे पाणी पळवण्याचा काम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार हेच करीत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा तरुण पोरगा याविरुद्ध तीव्र आंदोलन करेल. प्रसंगी रक्त सांडले व पाणी जाऊ देणार नाही, असे म्हणाले.

    वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून पालकमंत्री निष्क्रिय पद्धतीने काम करत असून, ते सोलापूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत असतात आहेत. ते कधीच जिल्ह्याकडे फिरकत नाहीत या उलट पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील अनेक ठेकेदारांना या जिल्ह्यातील विविध कामे देऊन पैसे लाटण्याचे काम करत आहे. भीमा नदीपात्रामध्ये घाणीचे साम्राज्य असून अनेकवेळा मागणी करूनही ते कधी भीमा नदीपात्रामध्ये पाहणी करण्यासाठी सुध्दा आले नाहीत उजनी पाणी पळवले.

    नदीला पाणीच येणार नाही व पुंडलिक मंदिराच्या समोर पाणी राहणार नाही व याठिकाणी उपजीविका करणाऱ्या कोळी समाज बांधवांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही पालकमंत्री यांचा जाहीर निषेध करतो.