संततधार पावसामुळे स्थलांतरीत मजुरांवर उपासमारीची वेळ ; गेली आठ दिवस सतत सुरु असणाऱ्या पावसाने शेतीची कामे खोळंबली 

पोटाची खळगी भरण्यासाठी तब्बल ५०० किलोमीटर अंतरावरून, पारनेर तालुक्यात आलेल्या सुमारे दीड ते दोन हजार शेतमजुरांना संततधार पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

    पारनेर : पोटाची खळगी भरण्यासाठी तब्बल ५०० किलोमीटर अंतरावरून, पारनेर तालुक्यात आलेल्या सुमारे दीड ते दोन हजार शेतमजुरांना संततधार पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

    विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दारवा, दिग्रस, फुलसौंगी, महागाव आदी गावांमधून हजारो शेतमजूर तालुक्यातील विशेषतः पारनेर, निघोज, भाळवणी परिसरात खरीप हंगामात मजुरीसाठी येत असतात. पिकांची खुरपणी, वाटाणा, मूग तोडणे, कांदा लागवड यासह शेतीची इतर कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने खरीप हंगामात या स्थलांतरित मजुरांना मोठी मागणी असते. दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा आणि मजुरांच्या जोडीला सातशे रुपये रोजाने मजुरी दिली जाते. मजुरी चांगली मिळत असल्याने तालुक्यात रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

     वडापाव, बिस्किटांवर काढवे लागतायेत दिवस
    गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिलेली नाही. तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे झालेल्या चिखलात वाटाणा, मूग तोडणे, खुरपणी करणे आदी कामे शक्य नसल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या तुटपुंज्या रकमेतून मजुरांना वडा पाव वर तर लहान मुलांना बिस्किटे खाऊन गुजराण करावी लागते. रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांची उपासमार सुरू आहे.

    यवतमाळ जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. प्रामुख्याने कापूस आणि तूर ही पिके घेतली जातात. त्यासाठी मजुरांची फारशी आवश्यकता नसते. रोजंदारीही कमी मिळते. पुरूषाला २५० रुपये तर महिलेला १२५ रुपये रोजंदारी मिळते. त्या तुलनेत जेवण जवळपास दुप्पट मजुरी मिळत असल्याने आम्ही नगर जिल्ह्यात विशेषतः पारनेर तालुक्यात मजुरीसाठी येतो. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मजुरीत फसवणूक होत नाही. जेवणही चांगले मिळते.

    - गंगाराम काशिराम होनमने,मजुर (फुलसौंगी, महागाव, जि.यवतमाळ)

    मुलांच्या शिक्षणाशी संबंध नाही
    स्थलांतरित मजुरांबरोबर त्यांची सहा महिन्यांपासून ते दहा-बारा वर्षे वयाची मुले आहेत. पारनेर तालुक्यातील खरीप हंगाम आटोपल्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या उस तोडणीसाठी मजूर कुटुंबियांसह जातात. मुलेही त्यांच्याबरोबर असतात. एकीकडे शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असताना स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा शिक्षणाशी संबंध येत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.