सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादकांना एप्रिलपासून दरवाढ मिळणार

माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना निवेदन

    सिंधुदुर्गमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना येत्या एक एप्रिल पासून दुधाला दरवाढ दिली जाईल असे आश्वासन गोकुळ दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिले आहे. आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सतीश सावंत आणि जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर येथे त्यांची भेट घेतली यावेळी हे आश्वासन देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाईच्या दुधामध्ये दरवाढ मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    शेतकऱ्यांना २०१४ पासून गोकुळ दूध उत्पादक संघ सहकार्य करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकटी मिळावी म्हणून गोकुळने चांगला उपक्रम सिंधुर्गात राबवला आहे. दूध संघामार्फत गाईच्या दुधाचे दर प्रति लिटर चार रुपये कमी करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत आले होते. या अनुषंगाने आज शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची भेट घेतली. यावेळी फोंडाघाट येथील शेतकरी मिथिल सावंत, भिरवंडे येथील रमेश सावंत, घोणसरी येथील गणेश परब, फोंडाघाट येथील विठोबा येंडे, डांबरे येथील संतोष साटम, वेंकटेश सारंग, प्रसाद सावंत, पिंटू भोसले, आंब्रड येथील टिपू सावंत, अमय ठाकूर आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी कोल्हापूरचे आमदार शेतकरी नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनाही शिष्टमंडळाने निवेदन सादर करून शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.