Millions of rupees lost due to fire in dumping yard at Kurkheda

कुरखेडा शहरातील गोळा केलेला संपूर्ण कचरा साठविण्याकरीता येथील सती नदीच्या तीरावर सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेच्या विहीरीजवळ डम्पिंग यॉर्ड निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास येथील कच-याने अचानक पेट घेतला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली.

    कुरखेडा : येथून वाहणा-या सती नदी परिसरात असलेल्या नगर पंचायतच्या डम्पिंग यॉर्डमधील कच-याला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. संपूर्ण डम्पिंग यॉर्ड आगीच्या विळख्यात सापडल्याने नगर पंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा शहरातील गोळा केलेला संपूर्ण कचरा साठविण्याकरीता येथील सती नदीच्या तिरावर सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेच्या विहीरीजवळ डम्पिंग यॉर्ड निर्माण करण्यात आले आहे.

    दरम्यान, आज दुपारच्या सुमारास येथील कच-याने अचानक पेट घेतला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. घटनेची माहिती वाहन चालक दीपक मेश्राम यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांना दिली. चंदेल यांच्यासह नगरसेवक पुंडलिक देशमुख, आशिष काळे, जयेंद्र चंदेल, मुजाहिद शेख, सामाजिक कार्यकर्ता ईश्वर ठाकरे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. लागलीच नगर पंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन वाहनाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

    सोलर पॅनल सिस्टम जळून खाक

    सती नदी तिरावर स्थापित नगर पंचायतच्या डम्पिंग यॉर्ड मधील कच-याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीमध्ये डम्पिंग यॉर्डमध्ये ठेवलेल्या साहित्यासह जवळच असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे सोलर पॅनल सिस्टम जळून खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर सोलर पॅनल सिस्टम लावल्या पासून बंद अवस्थेत होते. अज्ञात चोरांनी सोलर पॅनल सिस्टमच्या बॅट-या अगोदरच चोरुन नेल्या होत्या. त्यामुळे हा सोलर पॅनल सिस्टम निकामी होता. मात्र, आजच्या आगीमुळे सदर सिस्टम पूर्णपणे जळून खाक झाला.

    कर्मचा-यांच्या सतर्कतेने टळली जिवीतहानी

    कुरखेडा नगर पंचायतच्या डम्पिंग यॉर्ड जवळच लोकवस्ती आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे लोकवस्तीतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, डम्पिंग यॉर्ड मधील कर्मचा-यांच्या सतर्कतेने तत्काळ नगर पंचायतचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. वाहन वेळेवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे आग पसरली नाही. वेळेवर अग्निशमन वाहन आले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.

    आग विझविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

    दुपारच्या सुमारास अचानक डम्पिंग यॉर्डला लागलेल्या आगीची माहिती मिळताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नगर पंचायत कर्मचा-यांसोबत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला. अग्निशमन वाहन येईपर्यंत नागरिकांनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला होता.